पुणे : ‘गेल्या निवडणुकीत ज्यांनी चांगले काम केले त्यांचेच प्रभाग फोडण्यात आले आहेत. ‘पक्ष फोडा, घर फोडा, आणि आता प्रभाग फोडा असे फोडाफोडीचे राजकारण राज्य सरकार करीत आहे,’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
‘निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना ती पारदर्शक पद्धतीनेच झाली पाहिजे. यामध्ये कोणत्याही पक्षाचा राजकीय हस्तक्षेप असता कामा नये. नागरिक केंद्रबिंदू ठरतील, अशी प्रभाग रचना हवी,’ अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.
पुणे महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून नागरिकांच्या अडचणी, समस्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार सुळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. त्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये राज्यकर्ते फोडाफोडीच्या राजकारणात अडकले असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘ज्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीत नागरिकांच्या हितासाठी काम केले. जे ताकदवान आहेत. त्यांचे प्रभाग आगामी निवडणुकीसाठी जाणीवपूर्वक फोडण्यात आले आहेत. ही सरळ मनमानी आहे. महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र, इथे प्रभाग रचना एखाद्याच्या सोयीसाठी केली जात आहे. निवडणूक जिंकणे हा केंद्रबिंदू कसा असू शकतो? नागरिक केंद्रस्थानी असले पाहिजेत.’
‘राज्याच्या सत्तेतला सर्वांत मोठा पक्षच अन्याय करत आहे. इतकेच नाही, तर सत्तेतील काही मित्रपक्षांनीही याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अन्यायाच्या विरोधात बोलणे, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे ही भूमिका मांडतच राहणार. कायद्यानुसार प्रभाग रचना झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातील.’
‘लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा’
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत झालेल्या गोंधळावर सुळे म्हणाल्या, ‘या योजनेत सॉफ्टवेअरचे असे काय झाले, की पुरुष आणि स्त्री यात फरक कळलाच नाही? या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे. या भ्रष्टाचाराबाबत आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत. याला जबाबदार असलेल्यांची नावे समोर आली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.’
‘हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ द्यावी’
‘महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना येणार आहेत. या हरकतींसाठी ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र, गणेशोत्सवाचा काळ लक्षात घेऊन ही मुदत १० सप्टेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने प्रभागांची रचना केल्याने यावर असंख्य हरकती दाखल होतील,’ असेही खासदार सुळे यांनी सांगितले.