पुणे : ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे,’ अशी मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात सुळे यांनी फडणवीस यांना पत्र दिले आहे. ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली येथील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोरे, पनवेल येथील दिलीप डिसले आणि पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे.

घरातील कर्त्या पुरुषांवर हल्ला होत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी कठीण प्रसंगाचा धीरोदत्त सामना केला. कुटुंबीयांनी दाखविलेली हिंमत मोलाची आहे. त्यामुळे या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना एक मे रोजी नागरी शौर्य पुरस्कारने गौरविण्यात यावे. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे,’ असे सुप्रिया सुळे यांनी या पत्रात नमूद केले आहे.