कारागृह प्रशासनाकडून नकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले असल्याचे समजते. दरम्यान, याबाबत कारागृह प्रशासनाकडे अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

अ‍ॅड. गडलिंग यांनी कारागृहात उपोषण सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून गुरुवारी सायंकाळी मिळाल्यानंतर कारागृह विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. अ‍ॅड. गडलिंग यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी कारागृह प्रशासनाला अर्ज किंवा निवेदन देणे गरजेचे होते. मात्र, अद्याप अशा प्रकारचा अर्ज कारागृह प्रशासनाला देण्यात आला नसल्याची माहिती कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी रोजी नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण तसेच एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला होता. तपासात एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या साथींकडून (कॉम्रेड) आर्थिक मदत देण्यात आली, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून लॅपटॉप, काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ईमेल संपर्क, कागदपत्रांच्या पडताळणीत अ‍ॅड. गडलिंग, सेन, राऊत, ढवळे, विल्सन हे बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. अ‍ॅड. गडलिंग, सेन, राऊत, ढवळे, विल्सन न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surendra gadling hunger strike yerwada central jail
First published on: 14-09-2018 at 01:16 IST