पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा सुधारला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ गुणवत्ता सेवा परिषद (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल-एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी – एसीआय- एएसक्यू) यांनी गेल्या तीन महिन्यांतील सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एप्रिल ते जूनच्या तिमाही सर्वेक्षणात पुणे विमानतळातील सेवा गुणवत्तेत वाढ झाली असून, ते ५७ व्या स्थानी पोहोचले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ते ५९ व्या स्थानी होते.
पुणे विमानतळावर प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि त्यांच्या गुणवत्तेची वारंवार तपासणी होते. विमान प्रवाशांकडूनही याबाबत सूचना, हरकती मागविल्या जातात. त्यानुसार सेवा गुणवत्ता निर्देशांकात तीन महिन्यांत विमानतळावर पुरविल्या जाणाऱ्या ३१ सुविधांचे ‘गुणवत्ता सेवा परिषदेकडून’ विविध निकषांच्या आधारे सर्वेक्षण करण्यात येते.
त्यात विमानतळावरील स्वच्छतागृहांची परिस्थिती, टर्मिनलवरील स्वच्छता आणि लागणारा कालावधी, खान-पान सुविधा, माॅलमधील साहित्य खरेदी आणि विमानतळ परिसरातील कर्मचाऱ्यांकडून मिळणारा वागणूक, सुरक्षितता, प्रवेश करताना येणाऱ्या समस्या आणि अडचणी, विमान सेवा, समस्यांचे किंवा तक्रारींचे निराकरण करताना लागणारा कालावधी, पुरविण्यात येणाऱ्या इतर सुविधा, तत्परता आणि इतर बाबींच्या अनुषंगाने निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले.
पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल सुरू झाल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडूनही विमानतळावरील सेवांचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश झाला आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये पुणे विमानतळावर सुधारणा होत असून प्रवाशांना याचा फायदा होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
विमानतळावरील सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, सदस्य यांची वेळोवेळी बैठक घेऊन गुणवत्ता सुधारण्याबाबत सांगितले जात आहे. गर्दीच्या वेळेत किंवा विमानांच्या उड्डाणांना उशिर झाल्यास विमानतळावर प्रतीक्षाकक्षातील प्रवाशांसाठी सेवा पुरविण्यासाठी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी वेळोवेळी सूचना केल्या जात आहे,’ अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.