लोकसभेचे समीकरण चुकल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात नवे राजकीय समीकरण जुळणार आहे. राज्यपाल कोट्यातून राजू शेट्टी यांना विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय शरद पवार यांनी मंगळवारी घोषित केला. राजू शेट्टी यांनी बारामती मध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पुढील दाराने विधानसभेत गेलेले शेट्टी आता मागील दाराने का असेना पण पुन्हा एकदा आमदार होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. त्यांचे वर्षभरापूर्वी गेलेले लोकप्रतिनिधीत्व पुन्हा एकदा जमून येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस व मित्रपक्षांशी जवळीक साधली होती. या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पराभव झाला. तेव्हा स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देण्याचा निर्णय झाला होता. अलीकडे पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत स्वाभिमानीला संधी न दिल्याने राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आता राज्यपाल कोट्यातून काही विशिष्ट पात्रता असणारे विधान परिषद सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राजू शेट्टी यांनी आज बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंदबागेतील निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी विधिज्ञांशी झालेल्या चर्चेचा हवाला देत राज्यपाल कोट्यातील सदस्य होण्यासाठी राजू शेट्टी हे पात्र ठरतात असे स्पष्ट केले. त्याला शेट्टी यांच्याकडून होकार मिळाला. त्यावर पवार यांनी शेट्टी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

पुन्हा आमदारकी
राजू शेट्टी यांनी राजकीय कारकीर्द विधानसभा कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली होती. त्यानंतर ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर त्यांनी हातकलंगडे लोकसभा मतदारसंघात सलग दोनदा विजय मिळवला. तर मागील वेळी त्यांचा पराभव झाला होता. आता शेट्टी यांचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाल्याच्या शक्यतेने अनेक गावांमध्ये समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.