विधीसाठी १५०, बीएड्-एमएड्साठी १०० गुणांची परीक्षा 

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाने  २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील आठ अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) अभ्यासक्रम जाहीर केला. त्यानुसार विधीसाठी १५०, बीएड-एमएड आणि बीपीएड-एमपीएडसाठी १०० गुणांची परीक्षा होणार  आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी सीईटी घेण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि गुणांचे निकष नुकतेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील सीईटींचा अभ्यासक्रम संचालक डॉ. शैलेश देवळाणकर यांनी जाहीर केला. आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुण आणि निकष जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दिशा मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या निकषांनुसार, विधी तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांची १५० गुणांची सीईटी परीक्षा होईल. त्यासाठी विषय समान असले तरी गुणभार स्वतंत्र असेल. बीपीएड आणि एमपीएडसाठी ५० गुणांची लेखी, ५० गुणांची शारीरिक चाचणी अशी १०० गुणांची परीक्षा होणार आहे. बीए-बीएड, बीएस्सी-बीएड, बीएडसाठी १०० गुणांची परीक्षा असेल. बीएड इंग्लिश लँग्वेज कंटेट टेस्ट (ईएलसीटी) ही परीक्षा ५० गुणांची होणार आहे. तर एमएड तसेच बीएड-एमएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी १०० गुणांची सीईटी होईल. संबंधित अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइन होईल. परीक्षेत निगेटिव्ह गुण पद्धत राहणार नाही, असे डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले आहे.