करोना या आजाराने जगासमोर एक संकट निर्माण झालं आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व तसेच याचा उपाय शोधण्यासाठी सर्व देशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या जीवघेण्या व्हायरसने आता आपल्या देशासह राज्यात आपलं जाळ झपाट्याने विस्तारण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारसह प्रशासनाकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. मात्र, हे सर्व होत असताना पुण्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

ही परीक्षा ५ एप्रिल रोजी होणार आहे, त्यापूर्वी राज्यातील सर्व परीक्षांना ३१ मार्च पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ५ एप्रिल रोजी होणारी परीक्षा किमान २० दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी केली.

करोना व्हायरसने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. पुण्यात करोनाची बाधा झालेल्यांचा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. शिवाय राज्यातील आकडा देखील दिवसाकाठी वाढतचं आहे. हे पाहता राज्यातील धार्मिक स्थळ, मॉल, उद्याने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शाळा व महाविद्यालय यांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान म्हणजे ५ एप्रिल रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यभरातील लाखो विद्यार्थी देणार आहेत. मात्र या परीक्षेअगोदर विद्यार्थ्यांसमोर करोना व्हायरसने नवे संकट निर्माण केले आहे. कारण, ३१ मार्च पर्यंत सर्व शासकीय कार्यक्रमांसह अनेक परीक्षांना स्थगित देण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर अगदी पाचव्या दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे.

ही परीक्षा देणार्‍या विद्यार्थी अभ्यासिका, अनेक नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकून अभ्यास करत असतात. मात्र मागील आठवडाभरापासून पुण्यातील बहुतांश अभ्यासिका बंद असून तज्ज्ञांची मार्गदर्शनं देखील होत नाहीत. परिणामी अनेक मुले गावी गेली आहेत, खानावळी बंद झाल्या आहेत. तर अद्यापही जे शहरात आहेत त्यांना अभ्यास करणे व राहणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही विद्यार्थ्यांसोबत लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधींने संवाद साधला आहे.

लातूर येथील दिवणी तालुक्यातील अजित गद्रे हा विद्यार्थी म्हणाला की, मी अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. पण यंदा ऐन परीक्षेच्या तोंडावर करोना व्हायरसमुळे आम्हाला अभ्यास करणे कठीण झाले आहे. घरून फोन येतात गावी ये, तर दुसरेकडे अभ्यासिका बंद झाल्या आहेत, घर मालक म्हणतात गावी जा, मेसची व्यवस्था नाही. या सर्व परिस्थितीला आम्ही सामोरे जात आहोत. ३१ मार्च सर्व शासकीय कामांना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ५ एप्रिल रोजी आमची परीक्षा होणार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आयोगाने किमान २० दिवस तरी परीक्षा पुढे ढकलावी.

रेणापूर येथील अनिल डाके हा विद्यार्थी म्हणाला, ग्रामीण भागातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयार करत असतो. या परीक्षेच्या तयारीचा वर्षाकाठी दीड लाखांच्या आसपास खर्च येतो. शेती आणि इतर व्यवसायातून आम्हाला घरून पैसे दिले जातात. आम्ही वर्षभर तयारी करत असतो. पण यंदा करोना व्हायरसमुळे आम्हाला परीक्षा देणं कठीण झालं आहे. अभ्यासिका बंद झाल्या आहेत. आम्ही कसा अभ्यास करायचा, जर परीक्षेत अपयश आल तरं कुणी म्हणणार नाही की करोनामुळे अभ्यासावर परिणाम झाला असेल. कारण आम्ही आता एका वयाच्या उंबरठ्यावर असून घरच्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर गावाकडे बोलून घेतात. त्यामुळे आयोगाने किमान २० दिवस तरी परीक्षा पुढे ढकलली पाहिजे.