कृष्णा पांचाळ, प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी फायर कॅन्डलच्या कारखान्याला आग लागून सहा जणांचा होरपळून जागीच तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात सात जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गंभीर घटनेनंतर स्फोटके आणि ज्वालाग्रही पदार्थ वापरणाऱ्या कारखान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तळवडे याठिकाणी नऊ जणांचा जीव गेल्यानंतर या निष्पाप जीवांचा बळी घेतला कोणी असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे.
तळवडे येथील ‘तो’ स्पार्कल कॅण्डल बनवणारा कारखाना हा अनधिकृत होता. यासंबंधीची माहिती पोलिसांना नव्हती का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. की हप्तेखोरीच्या माध्यमातून हा कारखाना सुरू होता? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ‘त्या’ निष्पाप नऊ व्यक्तींचा काय दोष होता? याच पाप नेमकं कोणाला लागणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास तळवडे या ठिकाणी केकवर लावण्यात येणारी स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन ‘त्या’ आगीत जागीच सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे, हाच मृत्यूचा आकडा आता नऊ वर पोहोचला आहे. तर, सात जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी झालेल्या या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांची झोप उडवली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. मृतांच्या नातवाईकांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर झाली असली तरी त्या निष्पाप नऊ जणांचा बळी कुणी घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘त्या’ अनाधिकृत आणि विनापरवाना चालणाऱ्या कारखान्याची माहिती देहूरोड पोलिसांना नव्हती का? की हप्तेखोरी सुरू होती असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
तळवड्यातील ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नऊ निष्पाप व्यक्तींचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांचा फौज फाटा, अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. घटनेनंतर पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस यांना संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. दोन्ही प्रशासन एकमेकाकडे बोट दाखवण्यात दंग आहेत. अशा अनाधिकृत आणि विनापरवाना चालणाऱ्या कारखान्यावर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन कारवाई करताना उदासीन दिसत आहे. तळवडेतील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. त्या निष्पाप नऊ जणांचे बळी कुणी घेतले? पोलीस की महानगरपालिका हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
आणखी वाचा-पुणे : व्यायामशाळेतील लोखंडी प्लेट तरुणाच्या डोक्यात मारली, सहकारनगर पोलिसांकडून एकास अटक
“त्या अनधिकृत आणि विनापरवाना कारखान्याची माहिती पोलिसांना नव्हती. याची कल्पना असती तर कारवाई निश्चतच केली असती.” -काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त
“कारखाना हा विनापरवाना चालत होता, याची माहिती महानगरपालिकेला नव्हती. आम्ही आता अशा ठिकाणचे सर्वेक्षण सुरू केलेल आहे. फायर सेफ्टी न आढळल्यास त्यांना आम्ही नोटीस देणार आहोत” -प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त महानगर पालिका