क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना एकेक धाव गाठीशी बांधून शंभर धावा झाल्या, की त्या फलंदाजाचे शतक पूर्ण होते. शतकवीर हा या खेळामध्ये बहुमान समजला जातो. पण, आयुष्याची वाटचाल करताना मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्रातील डाॅ. एकनाथ चिटणीस, भाषा व्याकरणातील तज्ज्ञ यास्मिन शेख आणि शब्दविरहित चित्रांनी गालावर खुदकन् हसू उमटविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस अशी वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग यश संपादन करून वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेली तीन व्यक्तिमत्त्वे आणि तीही महिनाभराच्या अवधीत पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले.
केवळ शतक पूर्ण केल्याचा उत्सव नव्हे, तर त्यांच्या कार्याचे अधिष्ठान आपल्या जीवनामध्येही काही अंशी असले पाहिजे, हे त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने अनुसरले पाहिजे. शतकभराचा सामाजिक दस्तावेज असलेल्या या व्यक्तिमत्त्वांच्या असण्याचे महत्त्व त्यातून अधोरेखित झाले, तरच त्यांच्या शतायुषी जीवनाचे आपल्यासारख्या सामान्यांना सार्थक लाभेल.
आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाला नमस्कार केल्यानंतर ‘शतायुषी भव’ असा आशीर्वाद दिला जातो. पण, प्रत्यक्ष आयुष्यात शतायुषी होण्याचे भाग्य मोजक्याच व्यक्तिमत्त्वांना लाभते. एखादी व्यक्ती आयुष्याचे शतक पूर्ण करते तेव्हा ती केवळ स्वान्तसुखाय जगत नाही, तर त्यांचे शंभर वर्षे असणे समाजासाठीही भूषणावह असते. तसे ते असलेही पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून ‘सेन्च्युरी’ गाठणारी तीन व्यक्तिमत्त्वे पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले, तेही अवघ्या महिनाभराच्या कालावधीमध्येच.
तल्लख बुद्धिमत्ता आणि तीव्र स्मरणशक्तीने ही त्रिमूर्ती अजूनही कार्यरत आहे, यापेक्षा दुसरा आनंद तो काय! त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आपण समाज म्हणून कितपत उपयोग करून घेतो हा एका अर्थाने माणूस म्हणून आपल्याही जडणघडणीचा भाग असला पाहिजे. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या ज्येष्ठ अभिनेते डाॅ. श्रीराम लागू यांच्या नाटकाने रसिकांना मोहिनी घातली होती. त्याच धर्तीवर ‘शतक पाहिलेल्या माणसां’चे आपल्याला केवळ अप्रूप असून उपयोगाचे नाही. त्यांच्यापासून काही शिकलो नाही, तर समाज म्हणून आपण परिपक्वतेकडे जात आहोत, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.
ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांनी २१ जून रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. जन्माने ज्यू असलेली व्यक्ती मराठी भाषा, व्याकरण आणि शुद्धलेखन या क्षेत्रात आयुष्यभर झोकून देऊन काम करते, याचे यास्मिन शेख हे ठळक उदाहरण. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्या म्हणाल्या होत्या, ‘व्याकरण हा मुलांना रुक्ष, कंटाळवाणा आणि दुर्लक्षित करण्याचा विषय वाटतो. पण, त्याला भाषाविज्ञानाची जाेड दिली, तर व्याकरण समजण्यास सोपे जाते.’
राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्ष डाॅ. सरोजिनी वैद्य यांनी मला केलेल्या सूचनेतून आकाराला आलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ पुस्तकाच्या जन्मकथेची आठवण सांगतानाच वडिलांसह श्री. म. माटे, के. ना. वाटवे, प्राचार्य सोनोपंत दांडेकर आणि श्री. पु. भागवत यांच्यामुळे यास्मिन शेख घडली, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. आजीने नातवंडांना समजावून सांगावे, असा प्रेमभाव या निमित्ताने सर्वांनी अनुभवला.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) डाॅ. होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्यासमवेत काम करून देशाचे पहिले राॅकेट प्रक्षेपण केंद्र उभारण्यापासून पहिल्या दूरसंचार उपग्रहाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एकनाथ चिटणीस यांनी गेल्या शुक्रवारी (२५ जुलै) वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन्, माजी अध्यक्ष डाॅ. ए. एस. किरणकुमार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रमोद काळे, डाॅ. किरण कर्णिक, ‘आयसर’चे संचालक डाॅ. सुनील भागवत, ‘एनसीएससी’चे डाॅ. ए. पी. जयरामन, डाॅ. अ. पां. देशपांडे, डाॅ. सुहास नाईक-साटम आणि प्रा. माधवी रेड्डी आदी उपस्थित होते.
शब्दविरहित चित्रांनी गालावर खुदकन् हसू उमटविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी मंगळवारी (२९ जुलै) शंभर वर्षे पूर्ण केली. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. ‘विनोद आणि विसंगती अनेक वर्षांपासून असली, तरी अर्थपूर्ण विसंगती टिपणे हाच व्यंगचित्राचा आत्मा आहे,’ अशी फडणीस यांची भावना. ‘कागदापासून सुरू झालेला व्यंगचित्रांचा प्रवास आता आयपॅड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत येऊन ठेपला असला, तरी सर्जनात्मक पातळीसाठी कागदावरच व्यक्त व्हावे लागते. सर्जनाच्या पातळीवर मानवी क्षमता विलक्षण आहे. सहानुभूती आणि सहवेदना यांसारख्या भावना कृत्रिम बुद्धिमत्तेत रुजवता येत नाहीत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वांचे आपल्यामध्ये असणे हे आपल्यालाही समृद्ध करणारे असते, हीच बाब या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झाली आहे. शतायुषी व्यक्तिमत्त्वांना मानाचा मुजरा करताना त्यांच्याकडून काही गुण आत्मसात करणे हेच महत्त्वाचे ठरेल.
vidyadhar.kulkarni@expressindia.com