पुणे : राज्यातील सुमारे दहा हजार एकरावरील द्राक्षबागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, दर आणि मागणीअभावी द्राक्षे काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. द्राक्षांबरोबर बेदाणा- निर्मितीलाही फटका बसला आहे.राज्यात सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, उस्मानाबाद जिल्ह्यांत द्राक्षांखालील क्षेत्र साडेतीन लाख एकरच्या घरात आहे. आजघडीला राज्यभरातील सुमारे दहा हजार एकरावरील द्राक्षबागांमध्ये द्राक्षे आहेत. काढणीला आलेल्या या द्राक्षबागा अखेरच्या टप्प्यात अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. सोलापूर परिसरात सर्वाधिक सहा हजार एकर, तर पुणे, सांगली, उस्मानाबाद आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी हजार एकरवरील द्राक्षबागांमध्ये अद्यापही द्राक्षे आहेत.

बेदाणा काळवंडला

सांगलीच्या पूर्व भागात बेदाणा उद्योगाचा चांगला विकास झाला आहे. यंदा सुमारे दोन लाख टन बेदाणानिर्मितीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बेदाणानिर्मिती वेगाने सुरू असतानाच अवकाळी पाऊस कोसळला. तासगाव पूर्व भागात सलग चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे बेदाणा काळा पडत आहे. अपेक्षित रंग येत नसल्यामुळे अधिक खर्च करून गंधकाची धुरी द्यावी लागत आहे. साखर भरलेल्या द्राक्षांवर पाऊस झाल्यामुळे गोडी कमी होत आहे. उतारा कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

काय घडले?

निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत होता. नाशिक, नारायणगाव, बोरी, तासगाव, सोलापूर परिसरातून चांगली निर्यात सुरू झाली होती. पण, हंगाम जोमात असतानाच अवकाळीने घात केला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे ३० ते ४० रुपये दराने देशांतर्गत बाजारात विकावी लागली. सुपर सोनाका, अनुष्का जातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळत होता, पण अवकाळीमुळे आता २० रुपये इतकाही दर मिळणे मुश्कील झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्राक्षांचे दर पडले आहेत. बाजारातून मागणीही कमी आहे. अवकाळीमुळे द्राक्षघड कुजू लागले आहेत. अखेरच्या टप्प्यातील निर्यातक्षम द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. बेदाणा- निर्मितीवरही परिणाम होत आहे. – शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ