पिंपरी : खेड तालुक्यातील पाईटजवळील शिव कुंडेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त महिला भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारा टेम्पो ३० फूट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील दहा महिलांचा मृत्यू झाला. चालकासह २९ महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना सोमवारी पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्यादरम्यानच्या घाटात घडली.
शोभा पापळ (३३), सुमन पापळ (५०), शारदा चोरगे (४५), मंदाबाई दरेकर (५०), संजाबाई दरेकर (५०), मीराबाई चोरगे (५०), बायडाबाई दरेकर (४५), शकुबाई चोरगे (५०), पार्वतीबाई पापळ ( ५६) आणि फसाबाई सावंत (६१) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्यादरम्यान असणाऱ्या एका नागमोडी वळणावर अचानक पिकअप टेम्पो चढावरून खाली घसरला. चालकाने ब्रेक दाबून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दरीत कोसळला.
फुटलेल्या बांगड्या, चपलांचा ढीग
अपघात स्थळावर फुटलेल्या बांगड्यांचा खच, चपलांचा ढीग होता. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी महिलांना खासगी मोटारींतून तातडीने प्राथमिक उपचारांसाठी पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात, तसेच या परिसरातील दवाखान्यांमध्ये दाखल केले.
मृतांच्या नातेवाइकांना चार लाखांची मदत
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.