लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मावळातील कासारसाई धरणात बुडून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.आदर्श संतोष गायकवाड (वय १०,रा. वैदुवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. आदर्श हा कासारसाई धरण परिसरात मावशी पल्लवी साळवे हिच्यासह आला होता.
पल्लवी आणि आदर्श पाण्यात खेळत होते. त्या वेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदर्श बुडाला. आदर्श बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर पल्लवीने या घटनेची माहिती शिरगाव परंदवडी पोलीस चौकीला दिली. पोलीस उपनिरीक्षक बी. सी. गावित, हवालदार जॉन पठारे, पोलीस नाईक पी. एम. खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आणखी वाचा-मुंढव्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, उधारीवर सिगारेट न दिल्याने पानपट्टीचालकावर वार
मावळातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेतील जीवरक्षक निलेश गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे, राजाराम केदारी आदींनी शोधमोहीम राबविली. पाण्यात बुडालेल्या आदर्शला बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.