पुणे : कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत, रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच मोटारी, दोन रिक्षा आणि एका दुचाकीची तोडफोड केल्याची घटना घडली.

याबाबत मोहम्मद अन्सारी (वय ३२, रा. अश्रफनगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्रफनगर परिसरात टोळके आले. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडे कोयते होते. दहशत माजवून टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच मोटारी, दोन रिक्षा आणि एका दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर टोळके पसार झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. तोडफोडीमागचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पसार झालेल्या टोळक्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करत आहेत.