गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाचा एक भाग काढून त्यावर बोलणे योग्य होणार नाही. त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले पाहिजे. निवडणुकांमधील सुधारणांबाबत त्यांनी मुद्दे मांडले आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
जनकल्याण रक्तपेढीच्या स्वयंचलित रक्ततपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. निवडणूक खर्चाबाबत मुंडे यांनी केलेल्या विधानाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर होऊ नये, खर्चावर मर्यादा आसावी, असेच मुंडे यांनी म्हटले आहे. त्यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगही कारवाई करणार नाही. मुंडे यांनी स्वत: त्याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादीसारखे पक्ष ग्रामपंचायत व नगरपरिषदेसारख्या निवडणुकांमध्ये वारेमाप खर्च करतात. पक्ष कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी जे उपाय आहेत, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे.
पुण्याच्या विकास आराखडय़ाबाबत ते म्हणाले,की भाजपने जनतेच्या विरोधातील व विकास आराखडय़ाच्या विपरीत कोणत्याही उपसूचना केल्या नाहीत. त्यामुळे कुणावर कारवाईचा प्रश्नच येत नाही.
दरम्यान, जनकल्याण रक्तपेढीच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी रक्तपेढीच्या उपक्रमांबाबत अभिनंदन केले. समाजातील सेवाभाव जागृत ठेवण्याचे काम रक्तपेढीच्या माध्यमातून होत आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून देशसेवा व्हावी, असे ते म्हणाले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे, रक्तपेढीचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. दिलीप वाणी आदी त्या वेळी उपस्थित होते.