रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा >>>पुणे: दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना दहा मिनिटांचा वाढीव वेळ

गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच तपास पथकाला केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक जाहीर करण्यात आले आहे. राज्यात २०१८ ते २०२१ या कालावधीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ४३ पोलीस अधिकाऱ्यांना पदक मिळाले आहे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेखला, सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक दिनेश बारी आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्याप्रकरणात विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य पद्धतीने सुरू आहे, असे सेठ यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गंभीर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्यासाठी पोलिसांना काही मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने मार्गदर्शनपर नियमावली तयार करण्यात आली आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या कामकाजात गुन्ह्यांचा तपासाला महत्वाचे स्थान आहे. गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास तक्रारदार आणि नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल, असे सेठ यांनी सांगितले.