पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या बिलांचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मिळकतकराची साडेबारा लाख मिळकतींची बिले तयार असून, ती संबंधितांना टपाल विभागामार्फत पाठविण्यात आली आहे. पहिल्या दोन दिवसांत नागरिकांनी पाच कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे, मिळकतकर विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी ही माहिती दिली.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी एक एप्रिलपासून मिळकतकराची बिले नागरिकांना दिली जातात. मात्र, यंदा ४० टक्के सवलत मिळविण्यासाठीचे पीटी-३ अर्जांवर निर्णय न झाल्याने महापालिकेने एक महिना उशिरा बिले देण्यास सुरुवात केली. नागरिकांना महापालिकेने जाहीर केलेल्या विविध सवलतींचा फायदा घेऊन बिल भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असणार आहे. याचा फायदा घेऊन अधिकाधिक मिळकतकरदारांनी बिल भरावे, असे आवाहन प्रतिभा पाटील यांनी केले आहे. बिले भरण्याचा संदेश संबंधित मिळकतकरधारकाच्या मोबाईलवर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अपात्र मिळकतदारांना पुन्हा अर्ज करता येणार

मिळकतकरात ४० टक्के सवलत घेण्यासाठी पीटी ३ अर्ज भरून देणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांना ही सवलत मिळणार आहे. ज्यांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्रांअभावी अमान्य झाले. त्यांनी नव्याने अर्ज भरावे, ते पात्र ठरल्यानंतर त्यांना ४० टक्के सवलत दिली जाणार आहे.

नागरिकांच्या तक्रारी सोडवा, अन्यथा कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळकतकराची बिलांचे वाटप सुरू करण्यात आल्याने त्यावर काही नागरिकांचा आक्षेप असतो. त्यांच्या तक्रारीचे समाधान करण्यासाठी प्रत्येक भागातील मिळकतकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बसावे. तेथेच नागरिकांच्या तक्रारीचे समाधान करावे. संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यास नागरिक थेट महापालिकेच्या मुख्य कार्यालयात हेलपाटे मारतात. हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले. जे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.