पुणे : येत्या शैक्षणिक वर्षात २०२५-२६मध्ये विदर्भातील शाळा दरवर्षीच्या तुलनेत आठ दिवस आधी, २३ जूनपासून सुरू होणार आहेत. तर उर्वरित राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे १६ जूनपासून सुरू होणार आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी उन्हाळी सुटी, शाळा सुरू करण्याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे माहिती दिली. संकलित मूल्यमापन चाचणीमुळे यंदा शाळा २५ एप्रिलपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर परीक्षांचा निकाल १ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती रहावी या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या २० एप्रिल २०२३ रोजीच्या सूचनांनुसार उर्वरित राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात, त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू कराव्यात. तर विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरू कराव्यात, त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी शाळा सुरू कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्य मंडळाच्या शाळांना २ मेपासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व  विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, १६ जून रोजी सुरू करण्यात याव्यात. तर विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा  २३ ते २८ जून या कालावधीत शाळा सकाळी सात ते पावणे बारा या वेळेत सुरू करण्यात याव्यात. ३० जून पासून नियमित वेळेत शाळा सुरू कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.

 विदर्भातील शाळा लवकर सुरू करण्याचे कारण काय? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भातील तापमान लक्षात घेऊन तेथील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश या पूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र येत्या शैक्षणिक वर्षात विदर्भातील शाळा २३ जूनपासून सुरू करण्यामागील कारण काय, हे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले नाही