पुणे : चिंकारा, तरस या प्राण्यांसह विविध प्रकारचे पक्षी पाहण्याचा आनंद देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी कडबनवाडी (ता. इंदापूर) येथे विकसित करण्यात आलेली गवताळ प्रदेश सफारी पर्यावरण पर्यटनाचा (इको टुरिझम) उत्तम पर्याय ठरत आहे. पर्यटकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन वन विभागाने कडबनवाडी आणि शिर्सुफळ (ता. बारामती) येथील गवताळ सफारी प्रकल्पासाठीचा सविस्तर विकास आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. या विस्तारीकरणासाठी पाच ते सहा कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
राज्यातील एकमेव गवताळ प्रदेश सफारी हे वैशिष्ट्य असलेल्या या प्रकल्पाच्या विस्तार योजनेमध्ये तारानिरीक्षण सुविधा, माहिती केंद्र, अतिरिक्त पर्यटक वाहने आणि इतर पर्यटन अनुकूल वैशिष्ट्ये यांसारख्या अनेक नवीन उपक्रमांचा समावेश आहे. पर्यटकांचा अनुभव वाढवण्यासोबतच, पर्यावरणीय संतुलन सुनिश्चित करण्यासाठी गवताळ प्रजातींच्या अधिवास व्यवस्थापनावरही हा प्रकल्प लक्ष केंद्रित करेल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे वन विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये गवताळ व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग म्हणून सादर केलेल्या या प्रकल्पात पुण्यातील गवताळ प्रदेशाच्या जैवविविधतेचे दर्शन देत स्थानिक समुदायांना पाठिंबा देण्याबरोबरच संवर्धनाविषयीची जागरूकता वाढवली आहे.
या सफारीतून पर्यटकांना लांडगे, तरस, चिंकारा, भारतीय कोल्हे, गवताळ पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांसह विविध वन्यजीवांचे निवासस्थान असलेल्या गवताळ प्रदेशातील परिसंस्थेचे निरीक्षण करता येते. त्यामुळे निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी हे औत्सुक्याचे ठिकाण झाले आहे. या उपक्रमामुळे प्रशिक्षित स्थानिकांना स्थायी स्वरूपाचा रोजगार मिळाला आहे. वन विभागाने गवताळ प्रदेश सफारी प्रकल्पासाठी ऑनलाइन बुकिंग ॲप्लिकेशन विकसित केले आहे, अशी माहिती सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी दिली.
व्याघ्र सफारी प्रकल्प पावसाळ्यात काही काळासाठी बंद असतात. परंतु, गवताळ प्रदेश सफारी वर्षभर उपलब्ध असते आणि प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळा अनुभव मिळतो. २०२३ पासून सुरू केलेल्या या सफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये आतापर्यंत ४ हजार २९६ सफारी करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सुमारे १५ हजार पर्यटकांनी भेट दिली. या माध्यमातून ४९ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, त्यांपैकी २१ लाख ४७ हजार रुपये स्थानिक गाइडला मिळाले आहेत, असे ताटे यांनी सांगितले.
प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये करावयाची कामे
- गवताळ प्रदेश सफारीमध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि पक्षी यांच्या परिसंस्थेबद्दल माहिती उपलब्ध करून देणे.
- पर्यटकांसाठी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी दृक् श्राव्य स्वरूपामध्ये माहिती देण्याची योजना आहे.
- पर्यटकांसाठी बांबू गॅझेबो बांधणे, सेल्फी पॉइंट्स तयार करणे.
- पक्षिनिरीक्षणासाठी जागा तयार करणे
- आकाशनिरीक्षणासाठी दुर्बीण उपलब्ध करून देणे.
- सफारीसाठी वाहनांच्या क्षमतेमध्ये वाढ करणे.
- लोखंडी कठडे आणि सुरक्षा कॅमेरे बसवणे.