पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाप्रमाणेच औंध येथील जिल्हा रुग्णालयातही बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलांसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोटारचालक अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. श्रीहरी हाळनोर, डाॅ. अजय तावरे यांच्यासह दहा आरोपींविरुद्ध आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली होती. त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू करण्यात आला

कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रूग्णालयाप्रमाणे ओैंध येथील जिल्हा रुग्णालयातही अल्पवयीन मोटारचालक मुलासह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला, असा दावा विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयात केला. याबाबत ओैंध जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांचे जबाब असलेली कागदपत्रे हिरे यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बचाव पक्षाकडून न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. रक्ताचे नमुने बदल प्रकरणात बनावट दस्तऐवज तयार करण्यास काही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील काही कलमे लागू होत नाहीत. आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप स्पष्ट नाहीत, तसेच हे आरोप सर्व आरोपींविरुद्ध लागू होत नाहीत. त्यामुळे आरोप नव्याने तयार करण्यात यावेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात मंगळवारी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याने याप्रकरणात जामीन देण्याची विनंती न्यायालायकडे केली. आई आजारी असल्याचे अगरवाल याने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले. विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी न्यायालयात मंगळवारी कागदपत्रे सादर केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.