लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोजागरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी दुधाच्या मागणीत मोठी वाढ होते. यंदा कोजागरीला दुधाची आवक कमी प्रमाणावर झाली. घाऊक दूध बाजारात एक लिटर दुधाला ८३ रुपये लिटर असा भाव मिळाला. गणेश पेठेतील दूध बाजारात (दूध भट्टी) बुधवारी एक ते दीड हजार लिटर दुधाची आवक झाली.

सार्वजनिक मंडळे, विविध संस्था सोसायट्यांकडून सार्वजनिक स्वरुपात कोजागरी पौर्णिमा बुधवारी साजरी करण्यात आली. विविध मंडळे, संस्था, सोसायट्यांकडून दुधाला मागणी मोठ्या प्रमाणावर होती. डेअरी चालकांकडून दुधाला मागणी वाढली. अरण्येश्वर, खडकी, लष्कर, मुंढवा येथील गवळीवाडा तसेच नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई, वाघोली, केसनंद परिसर, भोर, वेल्हा, नसरापूर येथून दुधाची आवक झाली. घाऊक दूध बाजारात १८ लिटर दुधाच्या घागरीला १५०० रुपये असा भाव मिळाला. गेल्या वर्षी १८ लिटरच्या घागरीला १३०० रुपये असा भाव मिळाला होता. यंदा कोजागरीला दुधाला मागणी वाढली, मागणीच्या तुलनेत दुधाची आवक कमी झाल्याने उच्चांकी भाव मिळाला, अशी माहिती गणेश पेठेतील दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे आणि उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी दिली.

आणखी वाचा-नामांकित कंपनीच्या गोदामातून एक कोटींचे २८० लॅपटॉप चोरी, वाघोली पोलिसांकडून कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल

दिवाळीपर्यंत दुधाला मागणी

नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत दुधाला मागणी चांगली असते. दिवाळीत मिठाई विक्रेत्यांकडून दुधाला मागणी वाढते. मागणीच्या तुलनेत दुधाची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दिवाळीत प्रतिलिटर दुधाच्या दरात वाढ होईल, असे गणेश पेठ दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे आणि उपाध्यक्ष दामोदर तथा तात्या हिंगमिरे यांनी नमूद केले.

घाऊक दूध बाजारातील दर

१८ लिटर घागर – १५०० रुपये
एक लिटर दूध – ८३ रुपये

आणखी वाचा-‘बोपदेव घाट’ प्रकरणातील मुख्य आरोपीची डीएनए चाचणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूधाची आवक का कमी ?

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर परिसरात नागरिककरण वाढत आहे. नागरिकरणामुळे उपनगर, गावातील जागांना सोन्याचे भाव आले आहे. म्हशी पाळण्यासाठी जागेची कमरतचा जाणवत आहे. पुण्यातील गवळी वाडे, भोर, वेल्हा, हवेली, मुळशी, मावळ तालुक्यातील शेतकरी दूध विक्रीस पाठवितात. गाई, म्हशी महाग झाल्या असून, पालन खर्चही जास्त येत असल्याचे सांगण्यात आले.