पुणे : ‘पुणे शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,’ असे राज्याचे मागास बहुजन कल्याण विभाग व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
गंज पेठेतील महात्मा जोतिबा फुले स्मारकाच्या परिसराची मंत्री सावे यांनी पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे फुले स्मारकाच्या परिसरातील एक झाड वाकले होते. तसेच, स्मारकाच्या कौलांचे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी अतुल सावे आले होते. महापालिका व पुरातत्त्व विभागाने नुकसान झालेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यानंतर बुधवार पेठेतील भिडे वाडा येथील स्मारकाच्या कामालादेखील भेट दिली. आमदार योगेश टिळेकर, स्मारक समितीचे अध्यक्ष नीलेश गिरमे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सावे म्हणाले, ‘पुणे शहराला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा रहिवास लाभला आहे. राज्य सरकारने मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता समता भूमीच्या विस्तारीकरणाचाही प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल.’