पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील १४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांवरच निश्चित करण्यात आली आहे. दोष दायित्व कालावधीनुसार (डिफेक्ट लायबिलिटी पिरिअड) हा निर्णय घेण्यात आला असून, ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्त्यांची यादीही पीएमआरडीए प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते दुरवस्थेबाबत तक्रार आल्यास आणि ते तातडीने पूर्ववत न केल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत विविध प्रकारची विकासकामे सातत्याने सुरू असतात. पीएमआरडीएच्या हद्दीत ८१४ गावांचा समावेश असून भौगोलिक क्षेत्र सात हजार चौरस किलोमीटर एवढे विस्तारलेले आहे. त्यामुळे प्राधिकरणाअंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात निर्धारीत कालावधीत रस्ता खराब झाला तर, तो दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असणार आहे. त्याबाबतचे आदेश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही डाॅ. म्हसे यांनी स्पष्ट केले असून, दोष दायित्वाचा कालावधी रस्त्याच्या कामानुसार तीन ते पाच वर्षे निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा कोयता गँग सक्रिय; पिंपळेगुरवमध्ये तरुणावर कोयत्याने वार

दीडशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे

प्राधिकरणाच्या माध्यमातून २०१९ ते २०१४ पर्यंत एकूण १४८ किलोमीटर लांबीपेक्षा जास्त रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये मावळ तालुक्यात १४.५३ किलोमीटर, खेड तालुक्यातील १५.२४, मुळशीमध्ये १४ किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यात आले असून भोरमध्ये ७.२५, वेल्हे तालुक्यात ५.३५, हवेली तालुक्यामध्ये २६.३, पुरंदर येथे २२.१, दौंडमध्ये ७.८५ आणि शिरूर तालुक्यात ३५.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.

तालुकानिहाय कामांची संख्या

जिल्ह्यात ९२ रस्त्यांच्या कामांपैकी सर्वाधिक कामे हवेली, पुरंदरसह शिरूर तालुक्यातील आहेत. त्यानंतर मावळ, खेड आणि वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी ६, मुळशीमध्ये ९, भोरमध्ये ८, हवेलीमध्ये २६, दौंडमध्ये ५, पुरंदर आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी १३ रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>बोट उलटल्याने दोघांचा पवना धरणात बुडून मृत्यू; मृतदेह शोधण्यात यश

कोणती कामे प्रस्तावित

दोष दायित्व कालावधीत रस्त्यांची सुधारणा, रूंदीकरण, काँक्रिटीकरण आदी कामांचा समावेश आहे. किमान तीन ते कमाल पाच वर्षांपर्यंत ही कामे ठेकेदारांना करावी लागणार आहे. या कालावधीत रस्त्याची दुरवस्था झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांवर राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमआरडीएने ठेकेदारांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठीचा दोष दायित्व कालावधीत ठेकेदारांवर निश्चित करण्यात आला आहे. रस्त्यांची यादी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तक्रार अर्ज करावेत.- डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए