scorecardresearch

करोनाकाळात जगभरात कौटुंबिक हिंसाचारात वाढ ; अनेक देशांत महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी; लॅन्सेट नियतकालिकेचा शोधनिबंध प्रकाशित

करोना महासाथीच्या काळात संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदी काळात जगातील लाखो महिलांना त्यांच्या जोडीदाराने केलेल्या घरगुती हिंसाचाराशी दोन हात करावे लागले.

पुणे : करोना महासाथीच्या काळात संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदी काळात जगातील लाखो महिलांना त्यांच्या जोडीदाराने केलेल्या घरगुती हिंसाचाराशी दोन हात करावे लागले. करोना काळात जागतिक स्तरावर नोंदवण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. लॅन्सेट या नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित केला आहे.  करोना महासाथीला प्रतिबंध म्हणून लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जगभरातील उद्योगधंदे ठप्प झाले. शक्य तेवढे अधिक घरात राहूनच काम करण्याच्या सूचना जगभरातील देशांमध्ये देण्यात आल्या. त्यामुळे घरातील महिलांना जिवंतपणी नरकयातना भोगायला लागल्याचे विविध अहवालांतून दिसून आले.

जगाच्या कानाकोपऱ्यातील सुमारे ३६६ निरनिराळय़ा अभ्यासांवर आधारित स्वतंत्र शोधनिबंध लॅन्सेट नियतकालिकाने प्रकाशित केला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. जगातील तब्बल २० लाख १५ वर्षांवरील वयाच्या महिलांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून नोंदवण्यात न आलेल्या घटनांची माहिती याहून कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये इतर देशांच्या तुलनेत घरगुती हिंसाचाराच्या अधिक घटनांची नोंद झाली आहे.  करोना महासाथीच्या पूर्वीपासूनच महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण अक्षम्य होते. मात्र, संबंधित देशांच्या सरकारांकडून या घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याने करोना काळात अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे लॅन्सेटकडून नोंदवण्यात आले आहे.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणावरही मोठा परिणाम

करोना काळात घरी थांबणे सक्तीचे असल्याने महिलांना मोठय़ा प्रमाणात घरगुती हिंसाचार आणि लैंगिक अत्याचार या दोन्हींचा सामना करावा लागला. टाळेबंदी आणि जोडीदाराकडून झालेली घरगुती तसेच लैंगिक हिंसा यांचा महिलांच्या आर्थिक सबलीकरणावरही मोठा परिणाम झाल्याचे निरीक्षण लॅन्सेटकडून नोंदवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The rise domestic violence worldwide during coronation period ysh

ताज्या बातम्या