पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराला अटक करण्यात आली. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले दोन महिने हवालदार पोलिसांना गुंगारा देत होता. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात यापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी मलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ), सुश्मिता कसबे आणि करण राठोड यांना अटक केली होती. याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पीडित अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगडमधील आहेत. दोघे जण छत्तीसगडमधून पसार झाले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात सापडले. आरोपी हवालदार पवार याने ताडीवाला रस्त्यावरील रेल्वेच्या जागेत सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केली होती. ही संस्था बेकायदा सुरू करण्यात आली होती. रेल्वे स्थानकात पळून आलेल्या परगावाच्या मुलींना हेरून हवालदार पवार आणि त्याचे साथीदार सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत घेऊन गेले होते. तेथे त्यांना धमकावून पैसे उकळले जायचे. अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची माहिती बाल न्याय मंडळाला द्यावी लागते. पवार परस्पर पळून आलेल्या मुलांना या संस्थेत डांबून ठेवायचा. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते.

हेही वाचा – इंद्रायणी होणार प्रदूषणमुक्त : केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार फरार झाला होता. लोहमार्ग पोलीस त्याच्या मागावर होते. तो पुण्यातील घरी येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून पवारला अटक केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश देवीकर, पुणे रेल्वे स्थानक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा – पिंपरी : ‘टीडीआर’ घोटाळ्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन आमदार? महाविकास आघाडीच्या आरोपाने राजकीय वातावरण तापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेचे वसंत मोरेंकडून बेकायदा संस्थेची तोडफोड

आरोपी हवालदार अनिल पवार याने ताडीवाला रस्त्यावरील रेल्वेच्या जागेत सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केली होती. ही संस्था बेकायदा सुरू करण्यात आली होती. मनसेचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी संस्थेची तोडफोड करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. वसंत मोरे यांच्याकडून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला होता.