पुणे: राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ देण्यासाठीच्या पात्रतेबाबत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे. त्यानुसार आता व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील अथवा शेवटच्या सत्राची अंतिम परीक्षा देणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकणार आहेत.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ ही परीक्षा २४ मे ते ६ जून या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेच्या नोंदणीसाठी १० मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाने ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२५’ ही परीक्षा देण्यासंदर्भात सुधारित तरतुदीचा शासन निर्णय २ मो रोजी प्रसिद्ध केला. त्यानंतर परीक्षा परिषदेनेही किमान पात्रतेसंदर्भातील स्पष्टीकरण प्रसिद्ध केले.

शिक्षक निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाहीत.

पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे संबंधित व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकपासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. या मुदतीत असे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही.

विहित मुदतीत गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण, या गुणांनुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यानुसार व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील अथवा शेवटच्या सत्राची अंतिम परीक्षा देणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५चे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतील. ही तरतूद पुढील काळात होणाऱ्या सर्व अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचण्यांना लागू राहणार आहे, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील अथवा शेवटच्या सत्राची अंतिम परीक्षा देणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५साठी अर्ज करू शकतील. या बाबतच्या सूचना तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.