पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन उड्डाणपूल आणि रस्त्यांची उभारणी होत आहे. मात्र, कोंडी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. कारण शहरातील एकूण वाहनांची संख्या वाढत असून, यंदा नोव्हेंबरअखेर ती ४७ लाखांवर पोहोचली आहे. याचवेळी पुण्यात यंदा सुमारे तीन लाख नवीन वाहनांची भर पडली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, यंदा २५ डिसेंबरपर्यंत पुण्यात २ लाख ९० हजार ७९३ वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षी ही संख्या २ लाख ५४ हजार ५५१ होती. यंदा त्यात ३६ हजार २४२ ने वाढ झाली आहे. यंदा नवीन वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. नवीन वाहनांमध्ये १ लाख ८१ हजार ५८ दुचाकी, ७० हजार ९५९ मोटारी, १ हजार ४२९ बस, रिक्षा १२ हजार ९१८, १२ हजार ९२५ मालमोटारी, प्रवासी टॅक्सी ८ हजार ३९५, ट्रॅक्टर १ हजार ९४० यांचा समावेश आहे.

हेही वाचा… ‘ससून’मधील घोळ संपेना! सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याची वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील एकूण वाहनसंख्येचा विचार करता यंदा नोव्हेंबरअखेर ती ४७ लाख २ हजार १८२ वर पोहोचली. त्यात दुचाकी ३४ लाख ५१ हजार ७६५, मोटारी ८ लाख ४० हजार ७०९, प्रवासी टॅक्सी ४५ हजार ७८७, रिक्षा १ लाख ३ हजार ८२१, स्कूल बस ३ हजार ७१६, मालमोटारी ३९ हजार ९१, ट्रॅक्टर ३४ हजार ९०२ यांसह इतर वाहनांचा समावेश आहे. पुण्यातील वाहनसंख्येत दरवर्षी भर पडत असल्याने शहरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणखी बिकट होत आहे.