पुणे : स्वारगेट एसटी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी एक लाख दहा हजारांचा ऐवज लांबविला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्वारगेट परिसरात पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात राहायला आहेत. त्या स्वारगेट पीएमपी स्थानकात बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले.
दुसऱ्या एका घटनेत स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवाशाकडील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महाडला निघाले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरट्यांनी दोन घटनांमध्ये एक लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले.
स्वारगेट एसटी स्थानकातील बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. तरुणीला धमकावून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. बलात्कार प्रकरणानंतर स्वारगेट परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. पोलीस बंदाेबस्त आणि सुरक्षाविषयक उपाययोजना केल्यानंतर प्रवाशांकडील दागिने, रोकड, लॅपटाॅप, मोबाइल संच लांबविण्याचे सुुरू आहे.
मित्रमंडळ चौकात हार्डवेअर दुकानात चोरी
पर्वती भागातील मित्रमंडळ चौकात एका हार्डवेअर दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड आणि बॅटरी असा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक हे सहकारनगर भागात राहायला आहेत. त्यांचे पर्वती परिसरातील मित्रमंडळ चाैकात हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड आणि बॅटरी असा मुद्देमाल लांबविला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
दरम्यान, मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावरील एका गोदामातून चोरट्यांनी मोबाइल संच आणि रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रखवालदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रखवालदार आणि त्याचा मित्र गोदामात झाेपले होते. चोरट्यांनी गोदामाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. रखवालदार आणि त्याच्या मित्राकडील मोबाइल संच, तसेच रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.