पुणे नगर वाचन मंदिरमध्ये ‘आरएफआयडी’ यंत्रणा कार्यान्वित

विद्याधर कुलकर्णी

पुणे : वाचनालये आणि ग्रंथालयांमधून होणाऱ्या पुस्तकांच्या चोरीला आळा घालण्याच्या उद्देशातून ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) ही अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने त्याच्या नावावर नोंद न झालेले पुस्तक वाचनालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्यास ‘बीप’ असा आवाज होतो. तसेच, त्या व्यक्तीचे छायाचित्र टिपले जाऊन ते वाचनालयाच्या ई-मेलवर पाठवले जाते. या यंत्रणेमुळे पुस्तकांच्या चोरीला पायबंद बसणार आहे. पुणे नगर वाचन मंदिर या पुण्यातील वाचनालयाने ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

राज्यातील विविध ग्रंथालयांमध्ये लाखो पुस्तकांचा साठा सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या दुर्मीळ पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तक बदलण्याच्या निमित्ताने आलेले काही वाचक ग्रंथालयीन कर्मचाऱ्याच्या नकळत पुस्तक लंपास करतात. तसेच ग्रंथालयामध्ये अनाहूतपणे प्रवेश करून पुस्तके चोरली जातात. पुस्तकांची चोरी हा ग्रंथालयांसमोरचा एक जटिल प्रश्न झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्या समस्येवर उपाय शोधण्याचा एक भाग म्हणून ‘आरएफआयडी’ या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी स्थापन केलेले पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करत आहे. ग्रंथालयाकडे वेगवेगळ्या विषयांवरील एक लाखांहून अधिक पुस्तके आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य इमारतीमध्ये असलेल्या वाचनालयासह पुणे नगर वाचन मंदिरच्या शहराच्या उपगनरांमध्ये सात शाखा कार्यरत आहेत. आधुनिकतेची कास धरत पुणे नगर वाचन मंदिरने सर्व पुस्तकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ‘आरएफआयडी’ यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अहमदाबाद येथील  कंपनीतर्फे ही यंत्रणा बसविण्यात आली असून त्यासाठी १८ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पुस्तकांना बारकोड लावून संरक्षण देण्यात आले  आहे. आता इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याचे काम सुरू  आहे. तीन महिन्यांत चे पूर्ण होईल, अशी माहिती पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी दिली.

अशी आहे ‘आरएफडीआय’ यंत्रणा

पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयामध्ये आल्यावर सभासद बरोबर आणलेले पुस्तक ट्रेमध्ये ठेवतो. त्या वेळी पुस्तक परत केल्याची नोंद त्या वाचकाच्या नावावर होते. वाचकाने त्याच्या आवडीचे पुस्तक घेतल्यावर वाचनालयातून बाहेर पडताना सभासद पुस्तक पुन्हा ट्रेमध्ये ठेवतो. त्याने घेतलेल्या पुस्तकाची नोंद संगणकाद्वारे होते. एखाद्या सभासदाने पुस्तकाची नोंद न करताच आणखी पुस्तके नेण्याचा प्रयत्न केलाच, तर तो वाचनालयाच्या दारातून बाहेर पडताना ‘बीप’ असा आवाज होईल. त्यानंतरही त्याने निघून जाण्याचा प्रयत्न केला, तर समोर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे त्या व्यक्तीचे छायाचित्र टिपले जाते आणि ते वाचनालयाच्या ई-मेलवर पाठविले जाते, असे मधुमिलिंद मेहेंदळे यांनी सांगितले.