पुणे : पुणे विमानतळापर्यंत मेट्रो सेवेचा विस्तार करावा, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत महामेट्रोला सूचना केली होती. मात्र, विमानतळापर्यंत मेट्रो नेणे शक्य नसल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. भविष्यात विमानतळाला जोडण्यासाठी एखाद्या नवीन मार्गिकेचे नियोजन करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही महामेट्रोचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे मेट्रोच्या सेवेचा विस्तार आता रामवाडीपर्यंत होत आहे. यामुळे रामवाडीतून पुणे विमानतळापर्यंत मेट्रो न्यावी, अशी मागणी पुणेकरांसह राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सूचना केली होती. त्यानंतर महामेट्रोने या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासली होती. त्यात रामवाडीतून विमानतळापर्यंत मेट्रोचा थेट विस्तार शक्य नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे मेट्रोने हा प्रस्ताव आता रद्द केला आहे.

हेही वाचा – १२४ गावांचा विकास एमएमआरडीएच्या हाती; ‘नवनगरा’साठी शासन निर्णय प्रसिद्ध, हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळापर्यंत मेट्रोची सेवा नेण्यासाठी आधीपासूनच नियोजन व्हायला हवे होते. एकदा मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिचा विस्तार कशा पद्धतीने करावयाचा यावर मर्यादा येतात. रामवाडीतून थेट विमानतळाकडे सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरासाठी मेट्रो वळविणे शक्य नाही. भविष्यात एखादी नवीन मार्गिका विमानतळासाठी करावी लागेल. परंतु, आजच्या घडीला मेट्रो विमानतळापर्यंत नेणे अशक्य आहे.

मेट्रोचा भर फीडर सेवेवर

रामवाडी स्थानकातून विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांसाठी पीएमपीएमएलची फीडर सेवा सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. याचबरोबर रामवाडी स्थानकातून विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी रिक्षा संघटनांसोबतही चर्चा सुरू आहे. रामवाडी स्थानक ते विमानतळ हा प्रवास इतर वाहतूक पर्यायांच्या मदतीने प्रवाशांना सहजपणे करता यावा, यासाठी महामेट्रो आता प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा – पत्नीला उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, आरोपीला बंगळुरू येथून अटक

पुणे मेट्रोचा विस्तार पुणे विमानतळापर्यंत आता करता येणार नाही. रामवाडीपासून विमानतळ हा मेट्रो मार्ग शक्य नाही. कारण मेट्रो मार्गाची एकदा उभारणी झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. भविष्यात पुणे विमानतळापर्यंत एखादी मार्गिका सुरू करण्याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

देशातील सर्वाधिक व्यग्र असलेल्या पहिल्या दहा विमानतळांमध्ये पुणे विमानतळाचा समावेश आहे. मेट्रोच्या नियोजनात पुणे विमानतळाचा समावेश आधीपासूनच व्हायला हवा होता. हा दूरदृष्टीचा अभाव असून, पुणेकरांना योग्य पायाभूत सुविधांपासून कसे वंचित ठेवले जाते, याचेच हे उदाहरण आहे. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no metro to pune airport mahametro claims that the proposal is impractical pune print news stj 05 ssb
First published on: 06-03-2024 at 10:20 IST