पुणे : पुणे विमानतळावरील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हवाई प्रवास अडथळ्यांची शर्यत बनू लागला आहे. अनेक विमानांच्या उड्डाणांना होणारा विलंब मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यातच विमान कंपन्यांच्या विरोधातील प्रवाशांच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. पुणे विमानतळावर सध्या येणारी आणि जाणारी मिळून १८२ विमाने आहेत. विमानतळावरील गर्दी वाढत असल्याने तेथील सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यासाठी नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली. मात्र, उद्घाटनाला महिना उलटूनही ते सुरू झालेले नाही. सध्या उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विमानतळावर सुरक्षा तपासणी करण्यास विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. यावर विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याचवेळी डिजियात्राची सक्ती केली जात असल्याची तक्रार प्रवासी सातत्याने करीत आहेत.
विमान कंपन्यांकडून अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे. अनेक वेळा विमान कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. इंडिगोच्या विमानात बसण्यासाठी प्रवाशांना एरोब्रीजवर २५ मिनिटे ताटकळत थांबावे लागल्याचा प्रकार नुकताच घडला. स्पाईसजेटने १४ एप्रिलला पुणे ते दुबई विमानातील २५ प्रवाशांचे सामान गहाळ केले. ते सामान पुण्यातून विमानाचे उड्डाण होताना विमानात ठेवण्यात आले नाही. दुबईला विमान पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांचे सामान मिळाले नाही. कंपनीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधला असता प्रतीक्षा कालावधी एक तासाहून अधिक होता, अशी तक्रार अजित वाले या प्रवाशाने केली.
हेही वाचा : पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे ७० लाख आहे. ही संख्या २०२३ मध्ये ९४.५९ लाखांवर पोहोचली. ही संख्या २०२२ मध्ये ६९.२६ लाख होती. त्यात मागील वर्षी तब्बल ३७ टक्के वाढ झाली आहे. सध्या प्रवासी संख्येच्या बाबतीत देशात पुणे विमानतळ नवव्या स्थानी आहे.
हेही वाचा : ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरण महागात! अधीक्षक डॉ. तावरेंची तडकाफडकी उचलबांगडी
विमानतळावरील प्रवाशांच्या तक्रारी
- डिजियात्राचा वापर करण्याची सक्ती
- सुरक्षा तपासणीसाठी जास्त वेळ
- विमानतळावर खाद्यपदार्थांची अवाजवी किंमत
- एरोमॉलवरून कॅब मिळण्यात अडचणी
- वारंवार विमानांना होणारा विलंब
- विमान कंपन्यांचे अव्यावसायिक वर्तन
हेही वाचा : पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!
इंडिगोच्या विमानात मोडके आसन मला देण्यात आले. याबाबत तक्रार केल्यानंतर बसण्यास दुसरी जागा देण्यात आली. तसेच, कोणतेही कारण प्रवाशांना न सांगता उड्डाणांना विलंब लावण्यात आला. त्यामुळे माझे प्रवासाचे पुढील नियोजन बिघडले.
आकाश अगरवाल, प्रवासी