पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड चार लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नाना पेठेतील पद्मजी पार्क परिसरात घडली. वडगाव शेरी, तसेच हडपसरमधील फुरसुंगी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चाेरट्यांनी सात लाख रुपयांचा ऐवज लांबविला.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला पद्मजी पार्क परिसरातील दुर्गानिवास सोसायटीत राहायला आहेत. बुधवारी (२५ जून) दुपारी त्या सदनिका बंद करुन बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तपास करत आहेत.
वडगाव शेरीतील धनलक्ष्मी सोसायटीतील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.
फुरसंुगीतील तरवडे वस्ती परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा चार लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करत आहेत.