पुणे : दुचाकीस्वार दाम्पत्याकडे पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी एक लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोथरूड भागातील उजवी भुसारी काॅलनी परिसरात राहायला आहेत. पोलिसांनीं दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि त्यांचे पती रविवारी सकाळी दुचाकीवरुन धायरीला निघाले होते. वारजे चौकातील सेवा रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी दाम्पत्याला अडवले.

पोलीस असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. ‘या भागात महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत. तुम्ही दागिने काढून पिशवीत ठेवा’, अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली. त्यानंतर महिलेने दागिने काढून पिशवीत ठेवले. चोरट्यांनी दागिने पिशवीत नीट ठेवले का? अशी विचारणा करुन महिलेला बोलण्यात गुंतविले.

महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून एक लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. धायरीतील काम आटोपून दाम्पत्य घरी आले. महिलेने पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीतून दागिने लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे तपास करत आहेत.

बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध रहा

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस असल्याची बतावणी, तसेच महिलांना मोफत धान्य, साडी वाटप करण्यात येत असल्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बतावणी करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालाजीनगरमध्ये महिलेचे दागिने हिसकावले

पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला धनकवडीत राहायला आहेत. रविवारी (१० जून) त्या सकाळी सहाच्या सुमारास त्या बालाजीनगर परिसराून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी बालाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.