पुणे : लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या एकाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदारांना पोलिसांनी पकडले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी चार तासात चोरट्यांचा माग काढून त्यांना अटक केली. अनिल बळीराम वाघमारे, ऋषभ बाबा पिसे (दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. याबाबत विश्वनाथ अवधूत गिरी (रा. वाशिम) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गिरी खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता परिसरात आले होते. बुधवार पेठेतील विजय मारुती चौकाजवळ पिसे, वाघमारे तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी त्यांना अडवले. त्यांना धक्का मारुन भांडणे करण्यास सुरुवातकेली. गिरी यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखविला आणि खिशातील पाच हजारांची रोकड लुटून पसार झाले.
घाबरलेल्या गिरी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रिजवान जिनेडी, प्रमोद जगताप, गणेश दळवी, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, तुषार खडके यांनी तपास सुरू केला. पसार झालेले आरोपी पिसे आणि वाघमारे येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पिसे, वाघमारे सराइत असून पिसेला दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.