प्रकाश खाडे

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आज दर वर्षीप्रमाणे माऊलींचे आगमन न झाल्याने सारी जेजुरी नगरी सुनी सुनी वाटत होती.पुर्वापार प्रथेप्रमाणे आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघाल्यावर पुणे,सासवड असे मुक्काम करीत आज जेजुरी नगरीमध्ये हे येत असतो.परंतु यंदा करोना आजारामुळे माऊलींचा पालखी सोहळा निघू शकलेला नाही.माऊलींचे लहान बंधू संत सोपानकाकांच्या सासवडमधून पहाटे पालखी सोहळा निघाल्यावर जेजुरीत साडेपाचच्या सुमारास पोहोचतो.खंडोबाचा गड लांबूनच दिसू लागल्यावर दिंडीतील वारकरी बांधवांच्या आनंदाला उधाण येते.विठु नामाच्या गजरा बरोबरच यळकोट-येळकोट जय मल्हार असा जय घोष सुरु होतो.

वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर सारा थकवा विसरून जोरात नाचत खंडोबाची पारंपारिक गाणी,भारुडे गायली जातात.माऊलींचा पालखी रथ गावात प्रवेश करताच ग्रामस्थांकडून पिवळ्याधमक भंडार्‍याची मुक्त उधळण केली जाते.यावेळी मात्र हा आनंद सोहळा जेजुरीकरांना आपल्या डोळ्यात साठवता आला नाही.जेजुरीची अर्थव्यवस्था खंडोबाला येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे.त्यामुळे एरवी सर्वजण भाविकांची वाट पाहतात.परंतु माऊलींच्या आगमनाच्या वेळी मात्र साऱ्यांचे डोळे पालखी सोहळ्याकडे लागतात.वारकऱ्यांची सेवा करण्यात सारी जेजुरी नगरी गुंतलेली असते.गेल्या तीन महिन्यापासून खंडोबा मंदिर बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे.भाविक बंद असल्याने अर्थव्यवस्था कोलमडली असून खंडोबाचे दर्शन बंदच आहे आणि आज माउलींचेही दर्शन घेता आले नाही.माउली आपल्या गावात आले नाहीत याची रुखरुख सर्वत्र जाणवली.

वारीत चालून पाय किती थकले असली तरीसुद्धा हजारो वारकरी खंडोबा गडावर जाऊन दर्शन घेतात यावेळी गडावर महिला वारकरी फेर धरून पारंपारिक गाणी गातात,फुगड्या खेळतात,विठुरायाच्या बुक्का व खंडोबाचा भंडारा एकमेंकींना लावतात.यावर्षी जेजुरीत खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन आलेला एकही वारकरी पाहायला मिळाला नाही की टाळ-मृदुंगाचा आवाज नाही.माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माऊलींचा पालखी सोहळा न आल्याने दर्शन घडले नाही असे ९६ वर्षाचे लक्ष्मण खाडे गुरुजी यांनी सांगितले.

 

Story img Loader