पुणे : ‘ज्यांना पक्षाने सर्व काही दिले, ते पक्ष सोडून गेले. पडत्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, अडचणीच्या काळात काँग्रेसबरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांना ताकद आणि संघर्षावेळी संरक्षण दिले जाईल,’ अशी भूमिका राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे मंगळवारी मांडली. दरम्यान, ‘अडचणीच्या काळात पक्षाला सोडू नका. पक्ष देईल त्या उमेदवारासाठी एकदिलाने काम करा. पक्षविरोधात काम करू नका,’ असा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. त्या वेळी चेन्नीथला बोलत होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘देश कठीण परिस्थितीतून जात आहे. शेजारील देशांबरोबरचे संबंध बिघडले आहेत. अमेरिका भारताला धमकी देत आहे. मात्र, धमक्यांना घाबरून पंतप्रधान मोदी उत्तर देत नाहीत. राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर टिप्पणी करतात. त्यामुळे यापुढील काळात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचे काम करावे लागले. लोकशाही वाचविण्याच्या राहुल गांधी यांच्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मशाल मोर्चा काढावा आणि स्वाक्षरी मोहीम राबवून राहुल गांधी यांच्या लढाईला शक्ती द्यावी,’ असे चेन्नीथला यांनी सांगितले.

‘सरकार आणि पक्ष काम करत नाही, तेव्हा त्यांना नॅरेटिव्ह आणि परसेप्शनची आवश्यकता असते. काँग्रेसला त्याची गरज नाही. भाजपने खोटे वातावरण निर्मिती करण्याचे काम केले. काँग्रेसचा रस्ता हा सत्याचा आहे, तो कठीण आहे, पण त्याच मार्गाने काँग्रेस सुरुवातीपासून चालत आला आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी लोकशाही आणि राज्यघटनेचा रस्ता निवडला. त्यामुळे सध्या पंतप्रधान मोदी यांचा मार्ग सोपा वाटत असला, तरी लोकशाहीमुळे उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे तो कठीण आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे,’ असे पवन खेरा यांनी सांगितले.

स्वबळाची मागणी

‘देशासाठी इंडिया आघाडी झाली. राज्यासाठी महाविकास आघाडी झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी परिस्थिती पाहून निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावरच लढवू द्याव्यात,’ अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकीत स्वबळावर मुंबईत ३७ जागा जिंकल्या होत्या. वाईट काळ येतो आणि जातो. मात्र, स्वबळावर निवडणूक लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे,’ असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.