अभ्यासू आणि विचारी नट अशी डॉ. श्रीराम लागू यांची ओळख होती. जागतिक रंगभूमीची मराठी रंगभूमीला ओळख करून देण्याचे काम त्यांनी केले. आपला कलाप्रवास त्यांनी ‘लमाण’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून शब्दबद्ध केला होता. ‘नट हा फिलॉसॉफर आणि अ‍ॅथलिट असला पाहिजे’ अशी भूमिका डॉ. लागू सातत्याने मांडत होते. ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाइंडर’ या नाटकांना विरोध झाला त्या वेळी खंबीर भूमिका घेत ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.

डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी नाटय़स्पर्धामधून काम केले. ज्येष्ठ रंगकर्मी भालबा केळकर यांच्यासमवेत ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ (पीडीए) या  संस्थेची स्थापना केली. पुण्यामध्ये पीडीए आणि मुंबईमध्ये रंगायन संस्थेद्वारे त्यांनी विविध नाटकांतून भूमिका केल्या. मुंबई विद्यापीठातून कान-नाक-घसा तज्ज्ञ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लागू यांनी कॅनडा आणि इंग्लंड येथे अभ्यास करण्यासाठी रवाना होण्यापूर्वी पुण्यामध्ये सहा वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. १९६९ मध्ये रंगभूमीवर आलेल्या वसंत कानेटकर यांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी पूर्ण वेळ अभिनेता म्हणून कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. कानेटकर यांच्या ‘हिमालयाची सावली’ नाटकातील त्यांची भूमिका गाजली होती.

कलाकारासाठी अभिनय हाच महत्त्वाचा असतो. मग, ते नाटक असो, चित्रपट की तमाशा हा माध्यमाचा भाग नंतर येतो. एकदाचा अभिनय माझ्या बोकांडी असा बसला की तो मला सोडेनाच. ‘तू माध्यम कोणतेही घे. पण, अभिनय सोडू नको’, हेच मला खुणावत राहिले. त्यामुळे कलाकारासाठी माध्यमापेक्षाही अभिनय करणे हेच महत्त्वाचे असते, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

मागे वळून पाहताना छान वाटत आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आल्याचा पश्चात्ताप झाला नाही. अर्थात मी काही फार मोठा पराक्रम केला किंवा मोठे माप माझ्या पदरात पडले असा माझा बिलकूल दावा नाही. मी अभिनेता म्हणजेच नट आहे. मी नाटककाराचे शब्द रसिकांपर्यंत पोहोचविणारा मजूर नव्हे, लमाण आहे. त्यामुळे कलाकार अतृप्त असतो असे जे म्हटले जाते ते मला लागू होत नाही. नाटक हा प्रकारच असा आहे, की त्याने माझे नरडे पकडले. एखादा कलाकार कलेशी किती प्रमाणात प्रामाणिक वा बेशिस्त आहे याचे मोजमाप करण्याची कोणतीही फूटपट्टी नाही. काही कमी प्रमाणात असतात. काही अति तर काही फाजील आत्मविश्वासाने पछाडलेले असतात, असे त्यांनी नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

नाटकात काम करण्याआधी मी चित्रपटवेडा होतो. या माध्यमाविषयी प्रेम अधिक असल्याने अधिकाधिक चित्रपट पाहायचो. काही अद्भुतरम्य म्हणजे ‘फँटास्टिक’ आहे याची जाणीव झाली. चित्रपट हे माध्यम लोकांना सोपे, जवळचे आणि चांगले वाटले. नाटक करायचे तर ते आवडलेच पाहिजे असा मी अट्टहास कधी धरला नाही. नाटक करताना त्रास होत असेल, तर ते नाटक करूच नये. नट म्हणून व्यक्तिरेखा साकारणे एवढेच काम असते. मग त्या कलाकाराने भूमिकेत गुंतून राहायचेच नाही. त्यासाठी माणूस मनाने मोकळा असला पाहिजे. वेदनांनी व्यग्र असेल, तर मग त्याला नीट अभिनय करता येणार नाही, अशी त्यांची धारणा होती.

 सामाजिक कृतज्ञता निधीचे विश्वस्त

सामाजिक क्षेत्रात झोकून देत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रपंच चालविण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे, या भूमिकेतून अनेक समविचारी मित्रांनी स्थापन केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीचे डॉ. लागू विश्वस्त होते. निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डॉ. बाबा आढाव, प्रा. पुष्पा भावे यांच्यासमवेत त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामामध्ये सक्रिय योगदान दिले होते. डॉ. लागू यांनी मोठय़ा कलाकारांची मोट बांधून ‘लग्नाची बेडी’ नाटकाचे प्रयोग सामाजिक कृतज्ञता निधी या संस्थेच्या उपक्रमांसाठी निधी संकलित केला होता.

 डॉ. लागू यांचे गाजलेले मराठी सिनेमे – सामना (१९७४), पिंजरा (१९७२), सिंहासन (१९८०)

गाजलेले हिंदी सिनेमे – अनकही, अरविंद देसाई की अजीब दास्तान, इक दिन अचानक, कामचोर, घरोंदा, फूल खिले हैं गुलशन गुलशन, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, सरगम, सौतन  सिंहासन, पिंजरा, मुक्ता यासारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली.

मिळालेले पुरस्कार – फिल्मफेअर (१९७८), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२०१०) डॉ. लागू नास्तिक, तर्कसंगत विचारांना मानणारे विज्ञानवादी आणि समाजवादी होते. ते महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले होते.

महत्त्वाची नाटके..

डॉ. लागू यांनी १९६० च्या दशकात भारत आणि टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय केला. पण त्याचबरोबर पुरोगामी नाटय़संस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू ठेवले.  १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाटय़ अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून आरंभ केला. वेडय़ाचे घर उन्हात, जगन्नाथाचा रथ, गिधाडे, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस, आधेअधुरे, गाबरे, आत्मकथा, कन्यादान, पापा सांगा कुणाचे, प्रेमाची गोष्ट, खून पाहावा करून, दुभंग, सुंदर मी होणार, किरवंत, मित्र ही त्यांची महत्त्वाची नाटके.

डॉक्टरांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीवरच्या एका युगाचा अस्त झाला आहे. त्यांनी अभिनयात अनेक प्रयोग केले. मराठी नाटकात त्यांच्या प्रवेशानंतर लखलखता प्रवाह निर्माण झाला. मराठी चित्रपट, पुढे हिंदी चित्रपटांतही त्यांनी अभिनयाचा अमीट ठसा उमटवला. विचारवंत आणि माणूस म्हणूनही त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान मोठं आहे.     – ज्योती सुभाष, ज्येष्ठ अभिनेत्री

नटसम्राटाने एक्झिट घेतली. एक पर्व संपलं, पण विचार नाही.   – सुमित राघवन, अभिनेता

ते माझ्यासाठी ज्येष्ठ मित्र होते.  नाटकाच्या तंत्राचा जाणता अभिनेता, सामाजिक चळवळीतला नेता आपण गमावला आहे.  – सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात अगदी सुरुवातीपासून त्यांचे मोठे पाठबळ आणि सक्रिय सहभाग मिळाला. आपल्या विचाराला जे पटेल त्यासाठी निर्धाराने पडेल ती किंमत देऊन उभे राहण्याचा वसा त्यांनी आपल्या सर्वाना दिला आहे.  – डॉ. हमीद दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते

मी दिग्दर्शक म्हणून घडू शकले ते केवळ त्यांच्यामुळेच. त्यांच्या सहवासात मला खूप काही शिकता आले.  बुद्धीप्रामाण्यवादी अभिनेता गेल्याचे अपार दु:ख आहे. – प्रतिमा कुलकर्णी,ज्येष्ठ दिग्दर्शिका

प्रायोगिक रंगभूमी आणि ‘रुपदेव’ या नाटय़संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या विचारांची बैठक पक्की होती. त्यामुळे आम्हा कलावंतांचा वैचारिक आधार हरवला आहे.   – चंद्रकांत कुलकर्णी,  लेखक-दिग्दर्शक

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाटय़सृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. ‘पिंजरा’, ‘सामना’ यासारखे चित्रपट आणि ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’ यासारख्या अजरामर कलाकृतींतून त्यांनी मराठी चित्रपट-नाटय़सृष्टी समृद्ध केली.  नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

संहितेचा अभ्यास  करूनच ते रंगमंचावर यायचे. त्यांच्या सहवासात नाटकासोबत सामाजिक बांधिलकी जपणे म्हणजे काय हेही शिकता आले. — रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

प्रेक्षकांसाठी उक्तृष्ट नाट सोबतच रंगकर्मीसाठी एक दैवत होते. त्यांचे वाचन दांडगे, वैचारांची बैठक होती. अत्यंत स्पष्टवक्ते होते.अनेक संस्था तसेच कलाकारांना त्यांनी आर्थिक सहाय्य केले होते.  – दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेता

सर्व नवेदित तसेच जुन्या कलाकारांच्या कामगिरीबद्दल त्यांचे बारीक लक्ष असायचे. वेळोवेळी ते अभिनयाबाबत सूचनाही देत होते. नवीन पिढीने नाटकात नवीन प्रयोग करावे यासाठी ते अत्यंत आग्रही होते. – विजय केंकरे, अभिनेते

डॉ. श्रीराम लागू हे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील अभ्यासू, विचारी अभिनेते होते. त्यांनी अभिनयाचे व्याकरण सिद्ध केले. लॉरेन्स ऑलिव्हिए, गणपतराव जोशी, शंभू मित्रा यांच्या परंपरेतील डॉ. लागू एक होते. अतिशय आधुनिक असे त्यांचे विचार होते. त्यांच्या जाण्याने भारतीय रंगभूमीचे आणि पर्यायाने जागतिक रंगभूमीचे नुकसान झाले आहे.  – सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार

स्वतच्या भूमिकेचा, जीवनाचा आणि वास्तवाचा खोलवर विचार करणारा, त्याला ताठ कण्याने भिडणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे. सूर्य पाहिलेल्या नटसम्राटाचा अस्त झाला आहे. डॉ. लागू यांच्याशी ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकाच्या निमित्ताने जवळून संबंध आला. त्यांच्या जाण्याने व्यक्तिगत हानी झाली आहे, शिवाय नाटय़सृष्टीचेही नुकसान झाले आहे.  – मकरंद साठे, ज्येष्ठ नाटककार

अभिनेता काय असतो, हे डॉ. श्रीराम लागू यांनी नेमकेपणाने समजून घेतले आणि ‘लमाण’च्या रूपाने लिहूनही ठेवले. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनपासून डॉक्टरांशी जवळून संबंध आला.  अभिनयापासून माणूसपणापर्यंतची जाणीव डॉक्टरांनीच करून दिली. महाराष्ट्र समृद्ध का आहे, याचा विचार करताना डॉ. लागूंसारख्या व्यक्तींकडे पाहून कळते.  – प्रा. समर नखाते, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक

नाटक समजणारा, जगणारा अशा फार मोठय़ा कलाकाराला आपण मुकलो आहोत. त्यांचे संबंध जगणे हे कलाकाराचे होते. एखाद्या नाटकाची संहिता ऐकताना त्यांना पाहणे खूपच विलक्षण असायचे. एखादा तपस्वी आपल्यासमोर बसलाय असाच भास व्हायचा. त्यांच्यातील हा कलाकारच त्यांना स्वत:हून ‘जाणता राजा’ नाटय़ाला घेऊन आला. त्यांची ही आकस्मिक भेट मला खूप आनंद देणारी होती.    – बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर

रंगभूमीवरील चतुरस्र अभिनेता तसेच समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वास मी श्रद्धांजली अर्पण करतो. रुपेरी पडदा आणि नाटय़सृष्टीत त्यांनी त्यांच्या अभिनयातून ठसा उमटविला होता. सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण होती. आपल्यातून आज बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले. – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

सर्वार्थाने मोठा अभिनेता, रंगकर्मी आणि आमचे मार्गदर्शक डॉ.श्रीराम लागू गेले याचे दु:ख झाले आहे. नाटकांवर प्रेम करणारा माणूस हरपला आहे. –  सुबोध भावे, अभिनेता

ते  निरीश्वरवादी होते. रोखठोकपणा, स्पष्टवक्तेपणा त्यांच्याकडे होता. विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. सामाजिक कृतज्ञता निधीचे ते अध्यक्ष होते. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेशीही ते संबंधित होते. सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमीच हातभार राहिला. सामाजिक कृतज्ञता निधी उभा करण्यासाठी त्यांनी राज्यभर प्रयोग केले. या निधीतून काही कार्यकर्त्यांना मानधन दिले जात आहे.    – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. श्रीराम लागू यांचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्या जाणत्यांपासून ते होतकरू कलावंतांपर्यंत सर्वाना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.    – शरद पवार, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री