पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह बिघडल्याने गुरुवारी सकाळी हजारो लिटर पाणी वाया गेेले. हा व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने जलवाहिनी बंद न करता काम करण्याचा प्रयत्न केल्याने पाणी वाया गेले. अखेर व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
वडगाव जलकेंद्रातून सिंहगड रस्ता परिसराला पाणीपुरवठा करणारी ४५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह सकाळी बिघडला. ही जलवाहिनी गंगा भाग्योदय सोसायटीसमोरून जाते. तेथील व्हॉल्व्ह खराब झाल्याने पाण्याचा दाब कमी झाला. तसेच, पाण्याची थोडी गळती सुरू झाली होती. ही गळती रोखण्यासाठी व्हॉल्व्हची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी येथील पाणीपुरवठा बंद न करताच पाणीपुरवठा सुरू असतानाच दुरुस्तीचे काम सुरू केले.
यामुळे व्हॉल्व्हचे सेटिंग बिघडले. तेथून पाण्याचे मोठे कारंजे उडाले. हजारो लिटर पाणी वाया गेले. या पाण्याचा दाब इतका जोरात होता, की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तेथे कामच करता आले नाही. अखेर व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. हे दुरुस्तीचे काम दोन ते अडीच तास चालले. त्यानंतर पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.