लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (३० डिसेंबर) नवलाख उंब्रे येथे करण्यात आली.

हुसेन शेख (वय ३१), मोनिरुल गाझी (वय २६), अमीरूल साना (वय ३४) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. तर, त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोशन पगारे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बांगलादेशी नागरिक आहेत. वैध कागदपत्रांशिवाय ते भारतात वास्तव्य करत होते. त्यांनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत भारतीय असल्याचे भासवले. पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरवणीर आला आहे. शहरात सातत्याने बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे पोलीस कारवायांवरून दिसून आले आहे. औद्योगिक पट्ट्यात बांगलादेशी नागरिक स्थायिक असल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षात आयुक्तालयाअंतर्गत ३७ बांगलादेशी आणि मुळचे म्यानमारचे असणार्‍या दोन रोहिंग्या कुटूंबातील चौघांवर कारवाई केली. शहराच्या पत्यावर पारपत्र काढलेल्या ६२ बांगलादेशींचे पारपत्र रद्द करण्यात आले आहे. बांगलादेशीं नागरिकांना शोधण्यासाठी शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.