पुणे : पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी केली. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चाकणमध्ये नगरपरिषद असून या ठिकाणी विकासाच्या विकासावर मर्यादा येत आहेत. याच बरोबर हिंजवडीतही औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला बंधने येत आहेत. यामुळे चाकण, हिंजवडीला नवीन महापालिका केल्या जाणार आहेत. याचबरोबर उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाईल. कोणाला आवडो न आवडो या महापालिका होणारच आहेत.
हिंजवडी आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्या वारंवार समोर येत आहेत. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्यांवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यापासून दर आठवड्याला आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी औद्योग क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा आढावा घेतला.
हिंजवडीतील रस्ता रुंदी करण्याचा फैसला
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तांनी स्थानिक ग्रामस्थांशी गुरुवारी चर्चा केली. आता यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आज हे ग्रामस्थ बाजू मांडणार आहेत. यामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांचा चेंडू पुन्हा एकदा अजित पवारांच्या कोर्टात गेला आहे.