पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्येही ऑनलाइन शुल्क स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. उद्यान विभागाने शहरातील दहा उद्यानांमध्ये पॉइंट-ऑफ-सेल (पीओएस) मशिन्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फोन, गुगल पेसह इतर ऑनलाइन माध्यमातून पर्यटकांना तिकीट काढता येणार आहे.

महापालिकेने १ एप्रिलपासून डिजिटल कारभार सुरू केला आहे. परंतु, उद्यान विभागाचे शुल्क रोखीत स्वीकारले जात होते. रोख पैसे नसल्यास उद्यानात प्रवेश नाकारला जात होता. महापालिकेची लहान-मोठी २०१ उद्याने आहेत. त्यापैकी मोठ्या दहा उद्यांनामध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. आता दहा उद्यानांमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे. त्यासाठी पीओएस मशिन्स उपलब्ध केल्या आहेत. चिंचवड, पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासोर गार्डन) येथे प्रत्येकी दोन मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तर, निगडीतील दुर्गादेवी उद्यान, प्राधिकरणातील वीर सावरकर उद्यान, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यान, पिंपळेनिलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, भोसरी सहल केंद्र, थेरगाव बोट क्लब, नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यान आणि निगडी, प्राधिकरणातील मध्यवर्ती रोपवाटिका येथे प्रत्येकी एक मशीन बसवण्यात आल्या आहेत. मशिनच्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.

उद्यान विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे म्हणाले, ‘पीओएस आधारित कॅशलेस प्रणालीमुळे कामकाजात सुसूत्रता येईल. उद्यानांच्या प्रवेश व्यवहारांचे अधिक प्रभावीपणे निरीक्षण आणि लेखापरीक्षण करता येईल’.

उद्यानांमध्ये पीओएस मशिन्सचा वापर सुरू केल्यामुळे अधिक पारदर्शकता येईल. प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल ठसा राहिल्याने नागरिकांचा विश्वास वाढेल आणि त्यांना अधिक सोय होईल. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका