‘प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी जोडण्याची प्रक्रिया आयोगाने हाती घेतली असून आतापर्यंत वाटल्या गेलेल्या आधार कार्डापैकी ३२ कोटी आधार क्रमांक निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत. असे झाल्यास प्रत्येक मतदाराला स्वतंत्र ओळख मिळून पुन:पुन्हा मतदान करण्याला तसेच बोगस मतदानाला आळा बसेल,’ अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक किंवा दूरस्थ मतदान आयोगाच्या अजेंडय़ावर असून ही संकल्पना त्वरित अमलात येऊ शकणार नसली तरी काही वर्षांनी ती प्रत्यक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
‘सी-डॅक’तर्फे (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड काँप्युटिंग) आयोजित करण्यात आलेल्या ‘रीमोट व्होटिंग’ (दूरस्थ मतदान) या विषयावरील दोन दिवसांच्या परिषदेचे सोमवारी झैदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. निवडणूक आयुक्त अचल कुमार जोती, निवडणूक उपायुक्त विनोद झुत्शी, उमेश सिन्हा, गुजरातचे निवडणूक आयुक्त डॉ. वरेश सिन्हा, सी-डॅकचे महासंचालक रजत मुना, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी या वेळी उपस्थित होते.
देशात ८५ कोटी मतदाते असल्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे सांगून झैदी म्हणाले, ‘सी-डॅकने तयार केलेल्या ‘नॅशनल व्होटर सव्र्हिस पोर्टल’मध्ये या सर्व मतदात्यांची माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड मतदान ओळख पत्राशी जोडण्याची प्रक्रिया आयोगाने हाती घेतली असून देशात आतापर्यंत वाटल्या गेलेल्या ६२ कोटी आधार कार्डापैकी ३२ कोटी आधार क्रमांक निवडणूक आयोगाकडे आहेत. यामुळे प्रत्येक मतदाराला वेगळी ओळख मिळून पुन:पुन्हा मतदान करण्याला तसेच बोगस मतदानाला आळा बसेल.’ इलेक्ट्रॉनिक किंवा दूरस्थ मतदान आयोगाच्या अजेंडय़ावर असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ही संकल्पना त्वरित नव्हे, परंतु काही वर्षांनी प्रत्यक्षात येऊ शकेल. काही देशांमध्ये ही पद्धत वापरली जात असून काही देशांमध्ये ती फसली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेताना ते नियंत्रित वातावरणात म्हणजे ‘किऑस्क’ किंवा मतदान बूथवर घ्यावे की मतदाराला कुठूनही आपले मत देता यावे, तसेच ही पद्धत हा मतदानाचा एकमेव पर्याय असावा की तो अनेक पर्यायांपैकी एक असावा, या महत्त्वाच्या गोष्टी असून इलेक्ट्रॉनिक मतदानाची पडताळणी (ऑडिटॅबिलिटी) सर्वात गरजेची आहे. अशा पद्धती वापरताना ग्रामीण मतदारांचाही विचार व्हायला हवा.’
कोरे पोस्टल बॅलेट दूरस्थ मतदाराला पाठवण्यासाठी ‘इ पोस्टल बॅलेट’ या निवडणूक पद्धतीचा एक प्रस्ताव असल्याची माहिती झुत्शी यांनी दिली. अनिवासी भारतीयांसारख्या दूरस्थ मतदाराला पाठवण्यात येणाऱ्या पासवर्डद्वारे हे पोस्टल बॅलेट त्याने ‘डाऊनलोड’ करायचे अशी ही संकल्पना आहे.