पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील निवासी भागात पाणी घुसते. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी भागात पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर पावसाचे तसेच धरणातून सोडलेले पाणी नागरी भागात घुसू नये, यासाठी वडगाव खुर्द ते राजाराम पूल स्ट्रेच या भागात काम करण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.
मुठा नदीतील पुराची तीव्रता रोखण्यासाठी आणि नागरिकांसाठी सुशोभित नदीकिनारा उपलब्ध करून देण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन निधीतून ३०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नगरविकास विभाग-२ चे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. याचे पत्र महापालिका आयुक्तांनी पाठविले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेला पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरातील मुठा नदीच्या काठावरील एकतानगर, विठ्ठलनगर या वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पूरग्रस्त भागातील नागरिक आणि गृहसंस्था यांनी मुठा नदीच्या काठावर नदी सुधार प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे.
‘वडगाव खुर्द ते राजाराम पूल (स्ट्रेच-६) या भागाची एकूण लांबी ४.१० किलोमीटर आहे. या भागात दोन्ही काठांवर तटबंदी, वृक्षारोपण, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक आणि नाल्यांचा विकास केला जाणार आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नदीकाठच्या परिसराचे संरक्षण होणार असून, आजूबाजूच्या नागरी भागात पाणी शिरणार नाही. त्यामुळे नदी सुधार योजनेतंर्गत काम करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी विशेष मंजुरी द्यावी,’ अशी मागणी महापालिका आयुक्तांनी पत्राद्वारे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
काय आहे नदी सुधार प्रकल्प?
महापालिकेने गुजरात अहमदाबाद येथील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरात नदी सुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी खर्च अंदाजे ४ हजार ७२७ कोटी रुपये असून, पुणे महापालिका ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे. उर्वरित निधी पीपीपी आणि क्रेडिट नोट्सद्वारे उभारण्याची योजना आहे. संगमवाडी ते बंडगार्डन पुल (३.० किमी) हे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. बंडगार्डन ते मुंढवा पुल (५.३ किमी) या भागातील ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. वाकड बायपास ते सांगवी पूल (८.८ किमी) दरम्यानचे काम सध्या सर्वेक्षण टप्प्यात आहे.