पुणे : भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी रेल्वेने ‘भारत गौरव यात्रा’ सुरू केली आहे. मात्र, या यात्रेत महाराष्ट्रातील पर्यटनस्थळेच दिसत नसल्याचे चित्र आहे. या यात्रेत उत्तर आणि दक्षिणेतील धार्मिक आणि अन्य पर्यटन स्थळांना प्राधान्य देण्यात आले असून, महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना डावलले आहे.

केंद्र सरकारने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत ‘भारत गौरव यात्रा’ सुरू केली आहे. देशातील अनेक ठिकाणांहून धार्मिक पर्यटनासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे ‘भारत गौरव यात्रा’ सुरू आहे. इंडियन रेल्वे केटिरग अँड टूरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) या यात्रेचे नियोजन केले जाते. या यात्रेत प्रामुख्याने उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांवर भर देण्यात आला आहे. पुण्यातून जाणाऱ्या भारत गौरव यात्राही उत्तरेतील पर्यटन स्थळांसाठी आहेत.

‘भारत गौरव यात्रे’त ज्योतिर्लिग यात्रेचा समावेश आहे. त्यात पुण्यातील भीमाशंकर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर, परळीतील परळी वैजनाथ, हिंगोलीतील औंढा नागनाथ यांचा समावेश आहे. ‘आयआरसीटीसी’ने ऑक्टोबरच्या अखेपर्यंत २० भारत गौरव यात्रांचे नियोजन केले आहे.

पुण्यातून रामपथ भारत गौरव यात्रा

पुण्यातून रामपथ भारत गौरव यात्रा १३ जुलैला रवाना होणार आहे. ही यात्रा ७ रात्री आणि ८ दिवसांची आहे. ती २० जुलैला पुण्यात परतेल. ही यात्रा अयोध्या, वाराणसी, प्रयाग, चित्रकूट आणि जबलपूर येथे जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत गौरव यात्रांचे नियोजन दिल्लीतून केले जाते. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा समावेश करावयाचा की नाही, याचा निर्णयही तेथेच घेतला जातो. याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही. केवळ पुण्यातून निघणाऱ्या भारत गौरव यात्रांचे नियोजन पुणे विभाग करतो. – गुरूराज सोन्ना, विभागीय अधिकारी, आयआरसीटीसी