पुणे : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १२५ चौकांमध्ये बसविलेल्या सिग्नलमध्ये ‘ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (एटीएमएस) या प्रणालीचा वापर केला आहे. या प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करून त्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे वाहतूक कोंडी १५ टक्के कमी झाली असून, वाहनांचा सरासरी वेग १० टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीरज बी. पी यांनी ही माहिती दिली. वाहतुकीचे नियंत्रण योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून ‘एटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित केली होती. सुरुवातीच्या काळात या यंत्रणेबाबत अनेक तक्रारी येत होत्या. दर वर्षी महापालिका या यंत्रणेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही त्याचा अपेक्षित निकाल समोर येत नसल्याने महापालिकेचे पैसे वाया जात असल्याची टीका केली जात होती. चौकांमधील सिग्नलमध्ये बसविण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये महापालिकेने पोलिस विभागाच्या मदतीने काही बदल करून या यंत्रणेत सुधारणा केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी सांगितले.

या यंत्रणेत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे सिग्नलची वेळ आणि वाहतूक कोंडी यांत समन्वय साधला जात आहे. वाहनचालकांना चौकांमध्ये एकापाठोपाठ एक सिग्नल मिळत असल्याने प्रत्येक सिग्नलला थांबण्याची वेळ येत नाही. यामुळे वाहतूक कोंडी १५ टक्के कमी झाली आहे. सर्वसाधारणपणे ७० टक्के वाहनांना लाल सिग्नलला न थांबता अनेक चौकांमध्ये हिरवा सिग्नल लगेच मिळतो. परिणामी, सिग्नलवर वाहने थांबत नसल्याने प्रदूषणदेखील कमी होते आणि इंधनाची बचत होते.

महापालिकेने २०२२ मध्ये शहरातील १२५ चौकांमध्ये ‘एटीएमएस’ प्रणालीचा वापर करून सिग्नल यंत्रणा अद्ययावत केली आहे. प्रत्येक चौकात सिग्नलसह कॅमेरेही बसविण्यात आल्याने वाहनांची नोंद केली जात आहे. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले, सुधारणा काय झाल्या, रोज किती सिग्नल सुरू असतात, याचा अहवाल महापालिकेला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेलाही वाहतूक नियोजनाचा अभ्यास करून सुधारणा करणे शक्य होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असून, कोंडी कमी झाल्याचे निरीक्षण महापालिकेने केलेल्या पाहणीत नोंदविण्यात आले आहे.

एटीएमएस प्रणालीमध्ये सुधारणा करून गुगल मॅपचा वापर केल्यास चौकांऐवजी संपूर्ण रस्त्यावरची स्थिती लक्षात येऊ शकते. वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलच्या वेळेत बदल होईल. याचा अधिक फायदा वाहतूक सुधारण्यासाठी कसा होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका