पुणे : राखीपौर्णिमेचा सण, अनेकांचा कार्यालयीन साप्ताहिक सुट्टीचा वार आणि त्यातच पावसाची जोरदार हजेरी याचा फटका शनिवारी वाहतुकीला बसला. शहरातील मध्यवर्ती पेठांत खरेदीसाठी उडालेली झुंबड, रक्षाबंधनाचे निमित्त साधून हॉटेलांमध्ये झालेली गर्दी आणि सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे मध्यवर्ती भाग, उपनगरे आणि महामार्गांवर कोंडी पाहायला मिळाली.एकीकडे वाहनांची वर्दळ वाढलेली असतानाच रस्त्यांवरील खड्डे, ठिकठिकाणी सुरू असलेली पूल, मेट्रो, रुंदीकरण आदी विकासकामे, बेशिस्त वाहनचालक आणि त्यात पावसाची भर यामुळे शनिवार कोंडीचा वार ठरला.

त्यातच दुपारी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. स्वारगेट, शिवाजीनगर, महापालिका, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कोथरूड, डेक्कन यांसह मध्यवर्ती पेठांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू, पुणे-सातारा, पुणे-मुंबई, पुणे-नाशिक या मार्गांवर सकाळपासून वाहतूक कोंडीचे चित्र होते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर तर काही किलोमीटर दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते.वारजे-माळवाडी, आनंदनगर, सिंहगड रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, तसेच चाकण, हिंजवडी या परिसरांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक संथ झाली.

सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पूल ते नवले पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कात्रज ते खडीमशीन चौक, मगरपट्टा ते खराडी, हडपसर ते फुरसुंगी रस्त्यांवर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण पडला.

नाशिक, अहिल्यानगर मार्गावर कोंडी

पुणे-नाशिक महामार्गावर मालावाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. भोसरी, मोशी, आळंदी, चाकण या मार्गांवरही वाहतूक कोंडीची स्थिती कायम होती. अहिल्यानगरकडे जाताना खराडी बायपास, येरवडा, चंदननगर, वाघोली परिसरातही अशीच स्थिती असल्याने या मार्गावरील वाहनचालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला गेला.

स्वयंशिस्तीचा अभाव

गणेशोत्सव जवळ आलेला असल्याने शहरभर गणेश मंडळांचे मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे मूर्तीविक्रीचे स्टॉलही रस्त्यांवर लागले असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच अनेक नागरिक रस्त्यात थांबून खरेदी करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. बेशिस्त वाहतूक नियंत्रित करणे दिवसेंदिवस कठीण होत असून, वाहतूक पोलिसांना न जुमानता अनेक चालक बिनदिक्कत वाहतूक नियम तोडताना दिसतात. स्वयंशिस्तीच्या अभावामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.