पुणे : वाहतूक नियमनाऐवजी वाहनचालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या फरासखाना वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे असे निलंबित केलेल्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याचे नाव आहे. जामगे फरासखाना वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. ११ मार्च रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जामगे शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौकात (बुधवार चौक) वाहतूक नियमन करत होते. सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार बुधवार चौकातील सिग्नलवर थांबला होता.

हेही वाचा – पुणे : जेजुरी गड पुनर्विकासासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर

दुचाकीच्या वाहन क्रमांकाच्या पाटीवरील क्रमांक अन्य शहरातील होता. बुधवार चौकात नियमन करणारे जामगे यांनी दुचाकीस्वाराला अडवले आणि त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. दुचाकीस्वाराकडे परवाना नसल्याचे समजल्यानंतर जामगे यांनी त्याला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितला. दुचाकी वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे चौकशीत समजले. तेव्हा जामगे यांनी दुचाकीस्वाराला दहा हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. तक्रारदाराकडे डेबिट कार्ड नव्हते. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने दंड जमा करता येणे शक्य नव्हते. त्यानंतर तक्रारदार दुचाकीस्वाराची दुचाकी जामगे यांनी वाहतूक विभागात आणली. जामगे यांनी गणवेशावरील नावाची पट्टी (नेमप्लेट) पाडून ओळख लपविली.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सलग दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प

दुचाकीस्वाराने याबाबत वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी बाॅडी कॅमेऱ्याचा वापर करावा, असे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिला आहे. मात्र, जामगे यांनी कारवाई करताना बाॅडी कॅमेऱ्याचा वापर केला नाही. ११ मार्च रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रस्त्यावर गर्दी होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. अशा वेळी दुचाकीस्वाराला अडवून जामगे यांनी कारवाईच्या नावाखाली चर्चा करण्यात वेळ घालवला. वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष केले. जामगे यांचे वर्तन बेजबाबदार असल्याचे चौकशीत उघड झाल्याने पोलीस उपायुक्त मगर यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police employee who collected fine instead of traffic regulation suspended pune print news rbk 25 ssb
First published on: 15-03-2023 at 12:15 IST