शनिवार आणि रविवारी सर्वाधिक मोटारी मध्य भागात

शहराच्या मध्य भागात होणारी कोंडी नित्याची बाब झाली आहे. अरुंद रस्ते, कोंडीतून वाट काढणारे वाहनचालक, पादचाऱ्यांची गैरसोय, अशा अनेक समस्या मध्य भागात पाहायला मिळतात. आठवडय़ातील शनिवार तसेच रविवार या दोन दिवशी सर्वाधिक मोटारी शहराच्या मध्य भागात येतात. बेशिस्तपणे लावलेल्या मोटारींमुळे कोंडीत भर पडते. अशा वेळी मोटारींच्या चाकांना जॅमर लावताना पोलिसांची दमछाक होते. गेल्या तीन महिन्यांत मध्य भागात १,५९६ मोटारींना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली असून मोटारचालकांकडून तीन लाख ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य भागातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. अरुंद रस्ते, वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसणे, वाहनतळांची अपुरी संख्या अशा नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. मध्यभागातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता या रस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी कोंडी होती. विशेषत: आठवडय़ातील शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मोठय़ा संख्येने नागरिक मध्य भागात खरेदीसाठी येतात. अनेक जण मोटारीतून कुटुंबासह खरेदीसाठी येतात. मध्य भागातील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला मोटारी लावून खरेदीसाठी निघून जातात. अशा मोटारींच्या चाकांना जॅमर लावले जातात. जॅमर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा मोबाइल क्रमांक मोटारीच्या काचेवर लिहिलेला असतो. त्यानंतर मोटार काढण्यासाठी आलेल्या चालकाच्या निदर्शनास जॅमर कारवाईचा प्रकार आल्यानंतर तो पोलिसांशी संपर्क साधतो आणि दंडाची रक्कम भरून जॅमर काढून टाकला जातो. या बाबत विश्रामबाग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज पाटील ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, शहराच्या मध्य भागात मोठय़ा संख्येने मोटारचालक शनिवार आणि रविवारी खरेदीसाठी कुटुंबासह येतात. मात्र या मोटार  रस्त्याच्या कडेला मोटार लावल्या जातात.

दोनशे किंवा चारशे रुपयांचा दंड

जॅमर कारवाई केल्यानंतर तो काढण्यासाठी दोनशे रुपयांचा दंड आकाराला जातो. रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन लावल्यास चारशे रुपयांचा दंड करण्यात येतो. चाकाला जॅमर लागल्यानंतर निवांतपणे खरेदी करून मोटारचालक  कुटुंबकबिल्यासह तेथे येतो अन् दोनशे रुपयांची पावती फाडून जणू काही झाले नाही, अशा आर्विभावात निघून जातो. बऱ्याचदा मोटार कुठे लावायची, या कारणावरून पोलिसांशी हुज्जत घातली जाते. वादावादीचे प्रसंग, जॅमर कारवाई आणि कोंडी अशा समस्या दूर करताना पोलिसांची पुरती दमछाक होते. नदीपात्रात मोटारी लावण्यासाठी जागा उपलब्ध आहे, मात्र अनेक मोटारचालक शिवाजी रस्ता, बाजीराव व लक्ष्मी रस्त्यावर वाहने लावतात.

मध्य भागातील वाहनतळांवर मोटारी लावण्यास जागा अपुरी पडत आहे. शनिवारी आणि रविवारी मोठय़ा संख्येने मोटारी येतात. कारवाईबरोबरच कोंडी दूर करावी लागते. अनेक मोटारचालक बेशिस्तपणे मोटारी लावतात. त्यामुळे कोंडी होते. नदीपात्रातील रस्त्यावर मोटारी लावता येणे शक्य आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाने त्यांची जागा सायंकाळी वाहने लावण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

– अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा

सर्वाधिक जॅमर कारवाईचे रस्ते

* लक्ष्मी रस्ता

* बाजीराव रस्ता

* शिवाजी रस्ता

*  शनिवार वाडा परिसर

*  शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ

*  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल