देशभरातील टोल नाक्यांच्या रांगेत थांबल्याने वाया जाणारा वेळ व इंधन वाचविण्यासाठी ऐंशी लाख वाहतूकदारांकडून एकरकमी टोल भरण्याचा पर्याय केंद्र शासनापुढे ठेवला असताना त्यास शासनाने प्रतिसाद न दिल्याने ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून गुरुवारपासून (१ ऑक्टोबर) ट्रक, टेम्पो, ट्रेलर आदी मालवाहतुकीतील वाहने बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे संचालक बाबा शिंदे यांनी दिली. दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून खासगी बसही बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत स्कूलबसही बंद ठेवण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना बंदची सक्ती नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
देशभरातील ८० लाख, तर राज्यातील सात लाख वाहतूकदारांचा या बंदमध्ये सहभाग असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, देशभरातील टोलनाक्यांवर लागणाऱ्या रांगा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीमुळे वर्षभरात ८८ कोटी रुपयांचे नुकसान इंधनाच्या माध्यमातून होते. टोल नाका ही आमची समस्या नाही. पण, टोल भरण्यासाठी लागणारा वेळ व इंधन ही डोकेदुखी आहे. त्यामुळे आमच्या ८० लाख सभासदांकडून टोलसाठी लागणारी रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा पर्याय दिला होता. याबाबत मागील वर्षांमध्ये वेळोवेळी शासनाबरोबरच झालेल्या बैठकांमध्ये याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने बंदचा निर्णय घेण्यात आला.
पुणे ते दिल्ली या प्रवासात तब्बल १८ टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवर सरासरी २० मिनिटांचा वेळ धरल्यास चार ते पाच तास टोल भरण्यासाठीच जातात. बंदच्या या आंदोलनासाठी दूध, भाजीपाला व औषधांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर सक्ती करण्यात आलेली नाही. पुण्यामध्ये स्कूलबसचा व टोलचा संबंध नसल्याने येथे स्कूलबस बंद राहणार नाहीत. मात्र, टोलचा संबंध येत असणाऱ्या मुंबई, ठाणे व कल्याणमध्ये स्कूलबसचाही बंदमध्ये सहभाग असेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या बंदबाबतच्या मागणीला पुणे मालवाहतूकदार संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला असून, केंद्र शासनाच्या निषेधार्थ संघटनेच्या वाहतूकदारांकडूनही वाहने जागेवर बंद ठेवण्यात येतील, असे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हरपळे यांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2015 रोजी प्रकाशित
मालवाहतूकदारांचा आजपासून देशव्यापी बंद
एकरकमी टोल भरण्याचा पर्यायास शासनाने प्रतिसाद न दिल्याने ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून गुरुवारपासून मालवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 01-10-2015 at 03:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transporters on strike