पिंपरी: शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणपूरक राहणीमानाबददल जागरुक करणे गरजेचे आहे. प्लास्टिक मुक्ती, वसुंधरेच्या रक्षणाबाबत जनजागृतीपर धडे देवून त्यांना पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी केले पाहिजे, असे आवाहन पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी महापालिका, स्मार्ट सिटी व मुख्याध्यापक महासंघ यांच्या संयुक्त् विद्यमाने निगडी प्राधिकरणातील किर्ती विद्यालयातात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, क्षेत्रिय अधिकारी शीतल वाकडे, मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा प्राचार्या साधना दातीर, किर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक जाधव, प्राचार्या नेहा पवार आदी उपस्थित होते. शहरातील सुमारे २५० मनपा व खाजगी शाळांनी एकाच दिवशी आपल्या शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभाग नोंदविला, याकडे आयुक्तांनी यावेळी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्त म्हणाले की, पालिकेने शून्य कचरा व्यवस्थापन मोहीम हाती घेतली आहे. शाळांनी आपल्या परिसरात झाडांचा पालापाचोळा, कचऱ्याचे व्यवस्थापन करावे. खते तयार करून त्याचा वापर बागकामासाठी करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी त्यांना जागृत करावे. सुंदर शहराविषयी ऑनलाईन निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी व्हावे. हरित शहर, नव्याने विकसीत झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारच्या “सबका भारत, निखरता भारत” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने राबविण्यात येत आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.