पुणे : शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे ३० ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

शहरात मंगळवारी दुपारी साडेतीननंतर पावसास सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. शहर परिसरातील वेगवेगळ्या भागांत झाडांच्या फांद्या कोसळल्या. झाडे, तसेच फांद्या कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागातील अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने फांद्या हटविण्याचे काम सुरू केले. शहर परिसरात मंगळवारी रात्रीपर्यंत ३० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

येरवडा, कोरेगाव पार्क, धानोरी, टिंगरेनगर, एरंडवणे, उरळी देवाची, बावधन, मुकुंदनगर, हडपसर भागतील काळेपडळ, काळेबाेराटेनगर, फातिमानगरसह वेगवेगळ्या भागांत झाडे पडल्याच्या घटना घडल्या.

धनकवडीत सीमाभिंत कोसळली

धनकवडीतील तीन हत्ती चौक परिसरात एका सोसायटीतील सीमाभिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक संथगतीने

शहरात झालेल्या पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. वाहतूक नियोजनासाठी शहरातील प्रमुख रस्ते, तसेच चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. खड्डे, तसेच साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.